अल्पवयीन पिडीत मुलगी गर्भवती असल्याचे उघड; वैद्यकीय तपासणीतून धक्कादायक माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 06:39 PM2024-09-28T18:39:03+5:302024-09-28T18:39:23+5:30
वैद्यकीय अहवालानंतर पोलिस पिडीत मुलीचा पुरवणी जवाब नोंदविणार
केज (बीड): मामाने उपचारासाठी दवाखान्यात बोलवले असल्याची थाप मारून अल्पवयीन मुलीस हॉस्टेलसमोरून घेऊन जात अत्याचार केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली होती. आता वैद्यकीय तपासणीतून ही पीडित मुलगी गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने या प्रकरणाला कलाटणी मिळाली असून पोलिस या प्रकरणात अन्य आरोपी आहेत का याचा तपास करत आहेत.
बीड तालुक्यातील एका मुलीस मामाने शिक्षणासाठी केज येथील मुलींच्या वसतिगृहात ठेवले होते. ती नववीच्या वर्गात शिक्षण घेत होती. दरम्यान मंगळवारी (दि.24) रात्री नऊ वाजेच्या दरम्यान मामाने उपचारासाठी दवाखान्यात बोलविल्याची थाप मारून दोघांनी मुलीस हॉस्टेलवरून नेले. त्यानंतनर अंबाजोगाई महामार्गावरील एका लाॕजच्या पाठीमागील खुल्या जागेत अत्याचार केल्यानंतर तिला मुळगावी आणून सोडले. बुधवारी पीडितेने आईवडिलांना आपबीती कथन केली. यावरून सनी उर्फ स्वप्नील पाडळे आणि अमोल अंकुश जाधव ( दोघेही राहणार दहीफळ,चिंचोली ) यांच्यावर केज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद दाखल करण्यात आला.
दरम्यान, पिडीत मुलीची अंबाजोगाई येथील स्वाराति रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. वैद्यकीय अहवालानंतर पिडीत मुलीचा पुरवणी जवाब नोंदविण्यात येणार आहे. याप्रकरणात आणखीन कोणी आरोपी आहे का? याचा तपास करण्यात येईल अशी माहिती पिंक पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके यांनी दिली.