कवितेतून उमटल्या गरिबीच्या व्यथा, उपेक्षितांच्या कथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 11:19 PM2019-05-25T23:19:02+5:302019-05-25T23:19:27+5:30

औरंगाबाद : ‘फडताळात ठेवलेलं बेलणं पाहिलं की आजही उडतो थरकाप.. माय जेव्हा पोळ्या लाटायची, घर पीठ सारे काही दुसऱ्याचं, ...

The misery of poverty, the stories of the poorest of poets | कवितेतून उमटल्या गरिबीच्या व्यथा, उपेक्षितांच्या कथा

कवितेतून उमटल्या गरिबीच्या व्यथा, उपेक्षितांच्या कथा

googlenewsNext
ठळक मुद्देनिमंत्रितांचे कविसंमेलन : शताब्दी काव्य मंडळ आयोजित कविसंमेलन उत्साहात



औरंगाबाद : ‘फडताळात ठेवलेलं बेलणं पाहिलं की आजही उडतो थरकाप.. माय जेव्हा पोळ्या लाटायची, घर पीठ सारे काही दुसऱ्याचं, पण भूक मात्र माझी असायची..’ ही गरिबीच्या आठवणी सांगणारी कविता कवी गिरीश जोशी यांनी सादर केली आणि उपस्थित सारीच रसिक मंडळी भावविवश होऊन हळहळली. कुठे गरिबीच्या व्यथा, तर कुठे वंचित, उपेक्षितपणाची बोचरी धार कवितेच्या माध्यमातून निघून रसिकांच्या हृदयाला जाऊन भिडत होती.
शताब्दी काव्यमंडळातर्फे शनिवारी सायंकाळी मराठवाडा साहित्य परिषदेच्या डॉ. ना. गो. नांदापूरकर सभागृहात निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. ज्येष्ठ कवियित्री अनुराधा पाटील यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. कवयित्री संजीवनी तडेगावकर संमेलनाध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या, तसेच कवी श्रीकांत देशमुख यांची कार्यक्रमाध्यक्ष म्हणून उपस्थिती होती.
संमेलनादरम्यान काही कवींनी विविध सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचा, तर काही कवींनी विनोदी माध्यमातून वर्तमानावर भाष्य करण्याचा स्तुत्य प्रयत्न केला. बालाजी सुतार, प्रभाकर शेळके, श्रीराम पोतदार, आत्माराम जाधव, अनिल साबळे, डॉ. राज रणधीर, पंजाबराव मोरे, लक्ष्मण खेडकर, गिरीश जोशी, उमेश इंगळे निमंत्रित कवी या काव्यसंमेलनात सहभागी झाले होते.
सूत्रे कोणाच्याही हातात असली तरी वंचितांची दु:खे काही कमी होत नाहीत, या विषयावर भाष्य करणारी ‘आता विश्वास राहिला नाही’ ही कविता उमेश इंगळे यांनी सादर केली. त्यांच्या कवितेतील ‘अजूनही जमत नाही त्यांना दुर्बलांचा आधार व्हायला...’ या ओळी उपस्थितांची वाहवा मिळविणाºया ठरल्या. कोपर्डीसारख्या घटनांमधून महिलांवर होणाºया अत्याचाराविषयी भाष्य करणारी ‘येता गोंडस गोजिरं कुण्या हरिणीचं पाडस’ या आशयाची प्रभाकर शेळके यांची कविता उपस्थितांना अंतर्मुख करणारी होती. प्रत्येक कवीच्या कवितेतून त्याचे जागृत असणारे सामाजिक भान, चपखल निरीक्षणशक्ती स्पष्टपणे उमटत होती. उपस्थितांनाही विचार करण्यास भाग पाडणाºया या कविता रसिकांची मने जिंकणाºया ठरल्या.
दरम्यान, सुरुवातीला भाष्य करताना अनुराधा पाटील म्हणाल्या की, आज कवींच्या बाबतीत सर्वत्र अपेक्षाभंग, अनास्था असून, नव्याने उमलू पाहणाऱ्यांसाठी ही गोष्ट निराशाजनक आहे. आज माध्यमे ही कवींसाठी विनाशकारी ठरत आहेत. चार ओळी खरडून सोशल मीडियाच्या माध्यमातून वाहवा मिळवणे कवींसाठी अहितकारक आहे. शिकण्याचा, वाचण्याचा अभाव कवींना उथळ बनवत चालला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले, तर चांगल्या गोष्टी नियमित करणे हे कवीचे सांस्कृतिक कर्तव्य आहे. प्रत्येक कालखंडातील कवींना त्रास झाला असून, वेगळी परिभाषा मांडण्याचा प्रयत्न केल्यास नकाराला सामोरे जावे लागले असल्याचे श्रीकांत देशमुख यांनी सांगितले.


 

Web Title: The misery of poverty, the stories of the poorest of poets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.