सहा दिवस बेपत्ता तरुणीने घरी परतताच संपविले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 11:48 AM2023-07-25T11:48:32+5:302023-07-25T11:48:41+5:30
आत्महत्येचे कारण अस्पष्ट; बेपत्ता तरुणीने आई-वडिलांकडे न जाता मामाच्या घरी राहिली होती
वाळूज महानगर : आठवडाभरापूर्वी बेपत्ता झालेल्या १९ वर्षीय तरुणीने घरी परतल्यानंतर गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना सोमवारी सकाळी पंढरपुरात उघडकीस आली. निकिता रामदास मुगदल (रा. सलामपुरेनगर, पंढरपूर), असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
निकिता १७ जुलै रोजी रोजी घरातून बेपत्ता झाली होती. कुटुंबीयांनी तिचा नातेवाईक व परिसरात सर्वत्र शोध घेतला होता. ती न सापडल्याने तिची आई अरुणा मुगदल यांनी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात २१ जुलै रोजी निकिता बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. पोहेकॉ रेखा चांदे तिचा शोध घेत असतानाच रविवारी (दि.२३) निकिता घरी परतली. नातेवाइकांनी तिला सोबत घेऊन पोलिस ठाण्यात नेले. तिने मी स्वत: घरातून निघून गेले, तसेच माझी कोणाविरोधात तक्रार नसल्याचा जबाब पोलिस ठाण्यात दिला होता.
घरी परतताच संपविले जीवन
पोलिस ठाण्यातून पंढरपुरात आल्यानंतर निकिताने आईसोबत जाण्याऐवजी पंढरपुरातच मामा व आजीच्या घरी राहण्याचा आग्रह करून ती मामाकडेच थांबली होती. सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास तिने मामाच्या घरी दुसऱ्या मजल्यावरील रूममध्ये छताच्या हूकला उपरणे बांधून गळफास घेतला. घराचा दरवाजा उघडा असल्याने शेजाऱ्यांनी निकिताने गळफास घेतल्याचे पाहून या घटनेची माहिती तिच्या नातलगांना दिली. नातेवाईक विक्रम म्हात्रे, गौतम गायकवाड यांनी तिला खाली उतरविले. उपनिरीक्षक अशोक इंगोले, पोहेकॉ राजेंद्र उदे यांनी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवून दिला. या घटनेची एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू, अशी नोंद करण्यात आली.