हुकले मेडिकल तरीही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 07:56 PM2018-04-07T19:56:08+5:302018-04-07T19:56:41+5:30

विनोद : एक तज्ज्ञ तर, ‘उजवा पाय मोडला तेच बरे झाले, डावा मोडला, तर जास्त त्रास होतो,’ असे म्हणताना आम्ही स्वत: ऐकले आहे. उजवा किंवा डावा हात मोडला, तर दैनंदिन कामांमध्ये म्हणजे लिहिणे, जेवणे इत्यादीमध्ये फरक पडू शकतो; पण पाय कोणताही मोडला तरी फारसा फरक पडत नाही, हे ज्ञान बहुतेक चुकीचे आहे. 

missing Medical Still | हुकले मेडिकल तरीही

हुकले मेडिकल तरीही

googlenewsNext

- आनंद देशपांडे

आपला कुणी मित्र अथवा नातेवाईक काही कारणामुळे एखाद्या दवाखान्यात उपचार घेण्यासाठी अ‍ॅडमिट असेल तर संध्याकाळी तासभर त्याच्या रूममध्ये निवांत बसून राहा, अनेक तज्ज्ञ तुम्हाला भेटतील. समजा तुमच्या मित्राचे पायाचे हाड मोडले असेल, तर येणारा प्रत्येक जण त्याचा एक्स-रे आवर्जून पाहील. काही सुपर स्पेशालिस्ट तोच एक्स-रे उजेडाकडे धरून काळजीपूर्वक पाहून मगच आपले मत म्हणजे ओपिनिअन देतील. शिवाय रुग्ण ‘मोटारसायकलवरून पडताना डावीकडे पडला ते बरे झाले, उजवीकडे पडला असता, तर डोक्याला मार लागून कोमामध्ये गेला असता,’ असा अफाट निष्कर्ष सांगताना जसे काही याने ती घटना स्वत: पाहिल्यासारखे आत्मविश्वासाने सांगतील. 

एक तज्ज्ञ तर, ‘उजवा पाय मोडला तेच बरे झाले, डावा मोडला, तर जास्त त्रास होतो,’ असे म्हणताना आम्ही स्वत: ऐकले आहे. उजवा किंवा डावा हात मोडला, तर दैनंदिन कामांमध्ये म्हणजे लिहिणे, जेवणे इत्यादीमध्ये फरक पडू शकतो; पण पाय कोणताही मोडला तरी फारसा फरक पडत नाही, हे ज्ञान बहुतेक चुकीचे आहे. 

‘रिपोर्ट चांगला आहे; पण न्यूट्रोफिल्स वाढल्या आहेत’, ‘शुगर फास्टिंग एकशे वीस म्हणजे तुम्हाला डायबेटीज नाहीच, हा फक्त डॉक्टर लोकांचा लुबाडण्याचा धंदा आहे’, ‘गुडघ्याचे आॅपरेशन कशाला करताय, त्यापेक्षा तिकडे तामिळनाडूत एक जण तेल देतो त्याने मालिश करा, पंधरा दिवसांत पळायला लागाल’, दुसऱ्या एखाद्या ठिकाणी ब्लड रिपोर्ट पाहताच, ‘रिपोर्ट जे सांगतोय ते मी आधीच सांगितले होते, व्हायरल आहे म्हणजे प्लेटलेट कमी होतील, काळजी घे रे बाबा’ असे सांगून आपले हुकलेले मेडिकल पुन्हा गाठतील. 

आजूबाजूला एखादातरी स्वयंघोषित व्हॉटस्अ‍ॅप डॉक्टर असतोच, तो लगेच ‘डॉक्टरचे काही ऐकू नकोस, पपई खा, किवी फ्रूट खात जा आणि टोमॅटो सूप पीत जा सकाळ-संध्याकाळ म्हणजे बघ प्लेटलेट कशा दररोज वीस-तीस हजारांनी वाढतील,’ असा अनाहूत सल्लासुद्धा देताना दिसतो. ‘काळजी घे रे नीट, परवाच आमच्या घराजवळ एक जण डेंग्यूने गेला बरं का’ किंवा ‘आमच्या साडूच्या चुलत भावाला हार्ट अटॅकने गेल्याला आजच एक वर्ष झालं,’ अशा रम्य आठवणी काढून खाटेवरील रुग्णाच्या आधीच कमकुवत झालेल्या हृदयात धडकी भरविणाऱ्या स्वयंघोषित डॉक्टरांना ‘दहशतवादी डॉक्टर,’ असे म्हणता येईल.

वैद्यकीय म्हणजे डॉक्टरकीचे शिक्षण खरेतर अवघडच आहे, यात शंका नाही. एक तर जागा अत्यंत कमी आहेत, त्यातील बऱ्याचशा या मेरिट अधिक अतिरिक्त खर्च यामुळे सहज मिळतील अशा नाहीत. पदव्युत्तर शिक्षण आणखी अवघड आहे. एकदाचे ते पूर्ण झाले, की स्वत:चे हॉस्पिटल सुरू करण्यापूर्वी कुठल्यातरी मोठ्या दवाखान्यात अनुभव घेणे आवश्यक आहे, नाहीतर गाठ पेशंटच्या नातेवाईकांशी असते. म्हणजे एक स्पेशालिस्ट डॉक्टर तयार होतो तेव्हा त्याने आपल्या आयुष्यातील किमान पंधरा ते वीस वर्षे तो विशिष्ट अभ्यास करण्यासाठी घातलेली असतात, हे मान्य करावेच लागेल. 

अशा डॉक्टरांना नमवणारे लोक आज जागोजागी दिसत आहेत, ज्यांचे स्वत:चे शिक्षण कला किंवा वाणिज्य शाखेमध्ये झालेले असते, यांना ‘गुगल डॉक्टर’ म्हणता येईल. डॉक्टरने निदान केलला शब्द गुगलवर टाकला, की सगळी माहिती मिळते आणि याच माहितीच्या जोरावर पुढील भेटीत त्या एम.डी., डी.एन.बी. झालेल्या डॉक्टरला शिकवायला हे महाभाग मागे-पुढे पाहत नाहीत. स्वत: असे लोक आजारी पडले, तर निदान घेऊनच डॉक्टरकडे जातात आणि उपचार काय करता येईल याची चर्चा करतात. जो आजारी आहे तोसुद्धा खडखडीत बरे होताच अर्धा नाही, तर किमान पाव तरी डॉक्टर होतोच. ‘डाक्टर बने सिर्फ इक्कीस दिनो में’ अशा शीर्षकाचे पुस्तक आपल्या रेल्वेस्टेशनच्या बुक स्टॉलवर पाहून एक विदेशी पर्यटक चक्कर येऊन पडला होता म्हणे, इथे हे गुगल डॉक्टर्स तर एकवीस दिवससुद्धा थांबायला तयार नसतात. पदवी नसलेल्या बोगस डॉक्टरांना एकवेळ पकडता येईल; पण अशा स्वयंघोषित डॉक्टरांना आवरणार कसे याचे उत्तर सापडत नाही.
 

( anandg47@gmail.com )
 

Web Title: missing Medical Still

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.