रांजणगावातून महिला बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:05 AM2021-06-05T04:05:16+5:302021-06-05T04:05:16+5:30
वाळूज महानगर : रांजणगावातून एक ४० वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पतीने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात दिली आहे. ...
वाळूज महानगर : रांजणगावातून एक ४० वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पतीने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात दिली आहे. मंजुषा सुभाष शिंदे (४०, रा. नरसापूर, ह. मु. रांजणगाव) ही गुरुवारी (दि. ३) दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातून निघून गेली आहे. सर्वत्र शोध घेऊनही ती सापडली नाही. त्यामुळे त्यांचे पती सुभाष शिंदे यांनी पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली आहे.
फोटो क्रमांक- मंजुषा शिंदे (बेपत्ता)
------------------
रांजणगावातून अल्पवयीन मुलीचे अपहरण
वाळूज महानगर : रांजणगावातून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या अपहरणकर्त्याविरूध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रियंका एकनाथ बेडवाल (१६, रा. दत्तनगर, रांजणगाव) या मुलीचे गुरुवारी (दि. ३) अज्ञात व्यक्तीने अपहरण केले आहे. याप्रकरणी अपहरणकर्त्याविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
--------------------
कामगारांना किराणा साहित्याचे वाटप
वाळूज महानगर : मराठवाडा ग्रामीण विकास संस्था व ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने वाळूज एमआयडीसीतील कामगारांना किराणा साहित्याची किट व कोरोनापासून बचावासाठी साहित्याचे वाटप करण्यात आले. वाळूज एमआयडीसीतील प्रीसाईज इंडिया प्रा. लि. या कंपनीत संस्थेच्यावतीने कोरोनामुळे संकटात सापडलेल्या कामगारांना मदत करण्यात आली. यावेळी कामगारांची आरोग्य तपासणी करुन त्यांना मास्क, सॅनिटायझरने वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मनसुख झांबड, सचिव अप्पासाहेब उगले, व्यवस्थापक सुनीता नव्हाथे, अविनाश वाहुळे, राका महाराणा, प्रमोद क्षीरसागर, डॉ. संदीप शेळके आदींची उपस्थिती होती.
--------------------
रांजणगावात रस्त्याचे काम मार्गी लावा
वाळूज महानगर : रांजणगावातील छत्रपती शिवाजी महाराज ते कमळापूर फाटा या रस्त्याचे काम त्वरित मार्गी लावण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे. या रस्त्याचे एका बाजूने काम पूर्ण करण्यात आले असून, दुसऱ्या बाजूचे काम रखडले आहे. परिणामी अनेक वाहनधारक तयार रस्त्यावरून ये-जा करीत असल्याने या रस्त्यावर वाहतुकीची सतत कोंडी होत आहे. या रस्त्याचे उर्वरित काम त्वरित करण्याची मागणी नागरिकातून केली जात आहे.
---------------------------