बेपत्ता विवाहिता, दोन मुलांचे मृतदेह सापडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 01:01 AM2017-10-22T01:01:20+5:302017-10-22T01:01:20+5:30
: फुलंब्री तालुक्यातील नायगाव येथे पतीशी भांडण झाल्याने रागाच्या भरात घरातून निघून गेलेली विवाहिता, एक मुलगा व एक मुलगी यांचे मृतदेह नायगाव शिवारातील नालाबांध व विहिरीत मिळून आल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी सायंकाळी उघडकीस आली
लोकमत न्यूज नेटवर्क
पिशोर : फुलंब्री तालुक्यातील नायगाव येथे पतीशी भांडण झाल्याने रागाच्या भरात घरातून निघून गेलेली विवाहिता, एक मुलगा व एक मुलगी यांचे मृतदेह नायगाव शिवारातील नालाबांध व विहिरीत मिळून आल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी सायंकाळी उघडकीस आली. यानंतर मुलाचा मृतदेह पाहून बापानेही विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
याबाबत पिशोरचे सपोनि. अभिजीत मोरे यांनी सांगितले की, फुलंब्री तालुक्यातील नायगाव येथील विवाहिता पुष्पाबाई अंकुश गायकवाड (२५) हीचे नवºयासोबत भांडण झाल्याने ती आपला मुलगा गुड्डू उर्फ साईराज अंकुश गायकवाड (५) याच्यासह शुक्रवारी रात्री घरातून निघून गेली होती. याबाबत विवाहितेचा भाऊ अंकुश विठ्ठल काकडे (रा.धानोरा ता. सिल्लोड) यांनी रात्री १.३० वाजेच्या सुमारास पिशोर पोलीस ठाण्यात बहिण व भाचा हरवल्याबाबत तक्रार दिली होती. या तक्रारीत मुलीचा उल्लेख करण्यात आला नव्हता असे पोलिसांनी सांगितले.
शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पोलीस पाटील मयुरी गायकवाड यांनी पिशोर पोलिस ठाण्यात माहिती दिली की, गावातील गुड्डू उर्फ साईराज अंकुश गायकवाड हा मृतावस्थेत रामदास गायकवाड यांच्या गट नं. १० जवळील नालाबांधमध्ये आढळून आला आहे.
सपोनि अभिजीत मोरे, जमादार जगन्नाथ उबाळे, संजय देवरे, ईश्वर पाटील, संदीप कणकुटे व चालक सरवर खान हे घटनास्थळी दाखल झाले.
मयत मुलगा हा विवाहितेसह बेपत्ता झाला असल्याचे निष्पन्न झाल्याने परिसरात पुष्पाबाईचा शोध घेतला. बाजूला असलेल्या विहिरीतच दुर्दैवी पुष्पाबाई तसेच सोबत मुलगी गुड्डी अंकुश गायकवाड (३) यांचाही मृतदेह आढळून आला. पोलिसांनी गावक-यांच्या मदतीने विहिरीतील मृतदेह वर काढले. तिन्ही मायलेकांचे मृतदेह बघून उपस्थितांचे मन हेलावले.
पोलीस पाटील मयुरी गायकवाड यांनी दिलेल्या खबरीवरुन पिशोर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, तिघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असून रविवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे सपोनि. मोरे यांनी सांगितले. ऐन दिवाळी सणाला ही दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.