मिशन ॲडमिशन: आवडीचे पाॅलिटेक्निक काॅलेज मिळण्यासाठी १७,४७० विद्यार्थ्यांनी दिले पर्याय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 01:36 PM2022-08-26T13:36:55+5:302022-08-26T13:37:16+5:30
पाॅलिटेक्निक प्रवेशाची पहिली फेरी, आजपासून प्रवेश निश्चिती, अलाॅटमेंट जाहीर
औरंगाबाद : मराठवाड्यातील १० शासकीय व ४७ खासगी पाॅलिटेक्निक काॅलेजच्या १५ हजार ४० जागा असून, पहिल्या प्रवेश फेरीसाठी अलाॅटमेंट गुरुवारी जाहीर झाले. विद्यार्थ्यांच्या २१ हजार ६३४ अर्जांपैकी १७ हजार ४७० विद्यार्थ्यांनी ऑप्शन फार्म भरले. मिळालेले अलाॅटमेंट विद्यार्थ्यांना लाॅगीनमधून स्वीकारून आज, शुक्रवारपासून ३० ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चिती करता येणार आहे.
मराठवाड्यातील तब्बल ३० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. मात्र, पूर्ण अर्ज भरून पर्याय भरलेल्या अर्जांची संख्या निम्म्यावर आली. त्यातून आवडीचे काॅलेज, आवडीची शाखा मिळालेले विद्यार्थ्यी आजपासून प्रवेश निश्चितीला सुरुवात करतील. एकूण तीन प्रवेश फेरी आणि संस्था स्तरासह सर्व प्रवेशाची अंतिम ३० सप्टेंबर असणार आहे. पहिल्या फेरीत अलाॅटमेंट लाॅगीनमधून स्वीकारण्यासाठी २९ ऑगस्ट, तर २६ ते ३० ऑगस्ट काॅलेजमध्ये जाऊन प्रत्यक्ष प्रवेश घ्यायचा आहे. दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी ३१ ऑगस्टला जाहीर होईल. १ ते ४ सप्टेंबर ऑप्शन फाॅर्म भरा, तर दुसऱ्या फेरीची अलाॅटमेंट लिस्ट ६ सप्टेंबर रोजी जाहीर होईल. ७ ते १० सप्टेंबर अलाॅटमेंट निश्चिती, तर ७ ते१७ सप्टेंबर प्रत्यक्ष प्रवेश निश्चिती, तिसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा १२ सप्टेंबर रोजी जाहीर होतील. याच दिवशी पाॅलिटेक्निकचे वर्ग सुरू होणार आहेत. १३ ते १५ तिसऱ्या फेरीसाठी ऑप्शन भरणे, १८ ते २२ दरम्यान प्रवेश निश्चिती करून २२ ते २९ संस्था स्तरावरील प्रवेश होतील.
रोजगारक्षम संगणकीय ज्ञान देणार
संगणक क्षेत्रात नोकरीच्या संधी वाढल्या आहेत. त्यामुळे पाॅलिटेक्निक सोबत इच्छुक विद्यार्थ्यांना आवश्यक रोजगारक्षम संगणकीय ज्ञान देण्यात येणार आहे. उद्योगक्षेत्रातील मागणीनुसार सक्षम करण्याचा उपक्रम शासकीय पाॅलिटेक्निकमध्ये यावर्षीपासून सुरू करत असल्याचे तंत्रशिक्षण सहसंचालक उमेश नागदेवे म्हणाले.
८० टक्के विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीत पसंतीक्रम दिले. पहिल्या फेरीत गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत अधिक प्रवेश होण्याची अपेक्षा आहे. यावर्षी १०० टक्के जागा भरल्या जातील. पहिल्या फेरीनंतर १२ सप्टेंबरपासून पाॅलिटेक्निकचे वर्ग सुरू होतील.
-उमेश नागदेवे, सहसंचालक, तंत्रशिक्षण, औरंगाबाद
या विद्यार्थ्यांनी भरले पर्याय
जिल्हा - काॅलेज -नोंदणी -पर्याय भरले
औरंगाबाद-१३ -४७१२ -४६८२
बीड -१० -३३३६ -२७०३
हिंगोली -२ -६०३ -४२२
जालना -५ -२०९४ -१७२३
लातूर -१३ -४४९३ -३६०४
नांदेड -७ -२६१८ -२१२५
उस्मानाबाद -४ -१७४५ -१३९७
परभणी -३ -१०२२ -८२३