BE, BTech प्रवेशासाठी आवडीचे काॅलेज; अभ्यासक्रमाचे पर्याय देण्याची प्रक्रिया सुरू
By योगेश पायघन | Published: October 13, 2022 12:53 PM2022-10-13T12:53:02+5:302022-10-13T12:55:56+5:30
Mission Admission: अंतिम गुणवत्ता यादी जाहीर, १३ ते १५ ऑक्टोबर लॉगिनद्वारे भरा पहिल्या फेरीसाठी पर्याय
औरंगाबाद : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाची (सीईटी सेल) बी.ई., बी.टेक. या चार वर्षांच्या आणि मास्टर्स ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नाॅलाॅजी या इंटिग्रेटेड पाच वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी गुणवत्ता यादी आणि श्रेणीनिहाय जागावाटप बुधवारी जाहीर झाले. राज्य यादीत १ लाख २३ हजार २८८ विद्यार्थ्यांचा, तर १ लाख २९ हजार २८६ विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया यादीत समावेश आहे.
राज्यभरातून बीई, बी.टेक, प्रवेशासाठी १ लाख २९ हजार ६१२ अर्ज निश्चिती सुविधा केंद्रात केली होती. ७ हजार ४३४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. मात्र, अर्ज पूर्ण भरले नाहीत. ६ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले; मात्र अर्ज निश्चिती केली नाही. त्यापैकी ५३ अर्ज रद्द करण्यात आल्याचे सीईटी सेलकडून सांगण्यात आले. अंतिम गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना १३ ते १५ ऑक्टोबर दरम्यान उमेदवाराच्या लॉगिनद्वारे कॅप एक राऊंडसाठी पर्याय अर्जाचे ऑनलाइन भरणे आणि निश्चितीकरण करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. १८ ऑक्टोबरला कॅप-१ राऊंडसाठी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर १९ ते २१ ऑक्टोबरदरम्यान दुपारी तीन वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगीनमधून महाविद्यालय आणि अभ्यासक्रम निवडून २१ ऑक्टोबर सायंकाळी पाचपर्यंत जागा अलाॅटमेंट झालेल्या महाविद्यालयात जाऊन रिपोर्ट करावा लागणार आहे.
दुसरी व तिसरी फेरी
दुसऱ्या कॅप राऊंडसाठी २२ ऑक्टोबरला गुणवत्ता यादी जाहीर होईल. २३ ते २६ ऑक्टोबर पर्याय भरून अर्ज निश्चितीची प्रक्रिया आहे. ३० ऑक्टोबरपर्यंत महाविद्यालयात प्रत्यक्ष प्रवेश निश्चित करावा लागेल. १ नोव्हेंबर रोजी तिसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी प्रसिद्ध होईल. २ ते ४ नोव्हेंबर पर्याय भरणे, तर ६ नोव्हेंबर अलॉटमेंट जाहीर होईल. ७ ते ९ नोव्हेंबर महाविद्यालयात प्रवेश निश्चिती करावी लागेल.
संस्था स्तरावरील प्रवेश १० ते १७ नोव्हेंबर
संस्था स्तरावरील प्रवेशासाठी म्हणजेच १० ते १७ नोव्हेंबरपर्यंत प्रक्रिया केली जाईल. रिक्त जागा आणि रिक्त अभ्यासक्रमांसाठी ही अंतिम फेरी असेल. १ नोव्हेंबरपासून नियमित शिकविणे सुरू होईल.
एमई एम टेक.साठी २७७७ अर्ज
एम.ई. एम. टेक.साठी २७७७ अर्ज सुविधा केंद्रातून निश्चित करण्यात आले. ३११ जणांनी पूर्ण अर्ज भरले मात्र, सुविधा केंद्रात अर्ज निश्चिती केली नाही. ९६१ जणांनी नोंदणी केली; परंतु अर्ज पूर्ण भरलेला नाही. शुक्रवारी २१२१ विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली.
२० हजार ६२५ अडचणींचे निराकरण
राज्यभरातून ११ ऑक्टोबरपर्यंत १ हजार ३६३ ईमेल तर फोनद्वारे १९ हजार १६२ अशा २० हजार ६२५ अडचणी राज्य सीईटी सेलकडे मांडण्यात आल्या. त्यांचे निराकरण करण्यात आल्याचे सीईटी सेलकडून सांगण्यात आले.