मिशन बिगीन अगेन : मोबाईल आणि टॅबची पाच पटींनी वाढली मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 06:44 PM2020-06-12T18:44:19+5:302020-06-12T18:55:05+5:30
शिक्षण पद्धतीतल्या नव्या बदलामुळे लॉकडाऊन शिथिल होताच सगळ्यात जास्त गर्दी खेचली ती मोबाईलच्या दुकानांनी.
- रुचिका पालोदकर
औरंगाबाद : जून महिन्याचा पहिला-दुसरा आठवडा म्हणजे पुस्तक, दप्तर, गणवेश यांची दुकाने गर्दीने फुलून येण्याचा काळ; पण यंदा मात्र ही सर्व गर्दी मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक साहित्याच्या दुकानांकडे वळलेली दिसून येत आहे. आॅनलाईन शाळा आणि वर्क फ्रॉम होम यामुळे दि. ५ ते ११ जून या अवघ्या सात दिवसांच्या काळात शहरात जवळपास ५ कोटी रुपयांचे मोबाईल आणि टॅबची विक्री झाली आहे.
शिक्षण पद्धतीतल्या नव्या बदलामुळे लॉकडाऊन शिथिल होताच सगळ्यात जास्त गर्दी खेचली ती मोबाईलच्या दुकानांनी. जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून जवळपास सर्वच खाजगी शाळा आणि शिकवणीही आॅनलाईन पद्धतीने सुरू झाल्या आहेत. त्यामुळे खरेदीसोबतच मोबाईल, संगणक आणि टॅबच्या दुरुस्तीचेही प्रमाण वाढले आहे. १० ते २५ हजार रुपये या किमतीतले मोबाईल घेण्याकडे पालकांचा सर्वाधिक कल आहे. शाळा, क्लास आणि विविध प्रोजेक्टच्या माध्यमातून मोबाईलवरच करावा लागणारा अभ्यास यामुळे इयत्ता पाचवी आणि त्यापुढील प्रत्येक वर्गातल्या विद्यार्थ्याला मोबाईलवर कमीत कमी ५ ते ६ तासांचा वेळ घालवावा लागतो. त्यामुळे घरातील इतर सदस्यांचा मोबाईल वापरण्यापेक्षा पाल्याला एक स्वतंत्र मोबाईल देणेच अनेक पालकांनी पसंत केले. या नव्या बदलामुळे मुलांसाठी मोबाईल म्हणजे केवळ खेळ व मनोरंजनाचे साहित्य म्हणून राहिलेला नाही. त्याचा वापर अधिक व्यापक झाला असून मोबाईलवर अभ्यासही सुरू झाला आहे.
अॅक्सेसरीजच्या किमतीत वाढ
मोबाईल डीस्प्ले, टचपॅड, चार्जर किंवा अन्य मोबाईल अॅक्सेसरीजच्या किमतीमध्ये जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. या सर्व साहित्याचा पुरवठा चीनवरूनच मोठ्या प्रमाणावर होतो. आता आवक कमी झाल्याने या सर्व वस्तू विक्रेत्यांनाच जास्त किमतीत मिळत आहेत. त्यामुळे ग्राहकांनाही या वस्तूंसाठी दुप्पट पैसे मोजावे लागत आहेत, असे ज्ञानेश्वर खराडे यांनी सांगितले.
मोबाईलपेक्षा टॅबला पसंती
मोबाईलपेक्षा टॅबचा आकार मोठा असल्याने बहुसंख्य पालक आपल्या पाल्यासाठी टॅब खरेदीस प्राधान्य देत आहेत. नेहमीच्या तुलनेत पाच पटींनी मोबाईल आणि टॅबची विक्री वाढलेली आहे. या विक्रीत आणखी जास्त वाढ अपेक्षित होती; पण एका बाजूचीच दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी असल्याने त्याचा व्यवसायाला फटका बसला आहे.
- हरीस हानफी, मोबाईल विक्रेते
अॅक्सेसरीज आणि रिपेअरिंगलाही गर्दी
मोबाईल आणि टॅबची तर मागणी वाढलीच आहे; पण त्यासोबतच ब्लू टूथ, ईअर फोन, ब्लू टूथ हेडफोन, बॅटरी, चार्जर, ट्रायपॉड यांची विक्रीही वाढली आहे. १० हजार किंवा त्यापेक्षा अधिक किमतीच्या मोबाईलमध्येच आॅनलाईन शाळांसाठी लागणारी सर्व वैशिष्ट्य उपलब्ध आहेत. त्यामुळे १० हजारपेक्षा अधिक किमतीच्याच मोबाईलला पालकांची पसंती मिळत आहे.
- ज्ञानेश्वर खराडे, मोबाईल विक्रेते