‘मिशन बिगीन अगेन’ : औरंगाबादमधील लॉकडाऊन राहणार ‘जैसे थे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 02:27 PM2020-06-11T14:27:16+5:302020-06-11T14:36:14+5:30
‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत ज्या अटी लागू आहेत त्यानुसारच यापुढेही लॉकडाऊनची अंमलबजावणी होणार असल्याचे महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय आणि जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.
औरंगाबाद : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे १५ जूनपासून पुन्हा लॉकडाऊन लागू होणार असल्यासंबंधी केवळ सोशल मीडियात चर्चा असून, प्रत्यक्षात जिल्हा किंवा महापालिका प्रशासनाने लॉकडाऊन पुन्हा लागू करण्यासंदर्भात कोणतेच संकेत दिलेले नाहीत. राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत ज्या अटी लागू आहेत त्यानुसारच यापुढेही लॉकडाऊनची अंमलबजावणी होणार असल्याचे महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय आणि जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.
शहरात कोरोनामुळे मृत्यू आणि रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर शहरात आणि जिल्ह्यात लॉकडाऊन पुन्हा लागू करण्यात येणार असल्याची जोरात चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावरील विविध ग्रुपवर त्या पद्धतीचे ‘मेसेज’ फिरत असल्याने नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्येही लॉकडाऊन पुन्हा लागू होते की काय, अशी चर्चा सुरू झाली. यासंदर्भात ‘लोकमत’ने जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना विचारणा केली असता त्यांनी स्पष्ट शब्दांत लॉकडाऊन पुन्हा लागू होण्यासंबंधी कोणतीची चर्चा प्रशासकीय पातळीवर झाली नसून, शासनाकडूनही तशा सूचना नसल्याचे सांगितले. सद्य:स्थितीत जिल्ह्यात राज्य सरकारने ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत ज्या सूचना केलेल्या आहेत, तसेच लॉकडाऊनमध्ये जी शिथिलता दिलेली आहे, त्याचीच अंमलबजावणी होईल. महापालिकास्तरावरही अद्याप नव्याने लॉकडाऊन लागू करण्यासंदर्भात काही सूचना किंवा संकेत मिळालेले नाहीत, अशी माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली.
शासनाच्या परवानगीशिवाय किंचितही बदल नाही
महाराष्ट्र शासनाने १ जून रोजी अध्यादेश काढून लॉकडाऊनमध्ये टप्प्याटप्प्याने सूट दिली. या आदेशाची अंमलबजावणी महापालिका आणि जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. औरंगाबाद शहरात मागील दोन दिवसांपासून रुग्णसंख्या तसेच मृत्यूचे प्रमाण वाढल्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित होणार, अशी अफवा मागील दोन-तीन दिवसांपासून पसरविण्यात येत आहे. लॉकडाऊनमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही. राज्य शासनाच्या परवानगीशिवाय काहीच होणार नाही. सकाळी ९ ते ५ या वेळेमध्ये औरंगाबादकरांना जीवनावश्यक वस्तू दररोज खरेदी करण्याची मुभा राज्य शासनाने दिलेली आहे. त्याचप्रमाणे शहरातील व्यापाऱ्यांना सम व विषम पद्धतीने दुकाने उघडण्याची परवानगी दिली आहे. हीच पद्धत यापुढेही चालू राहणार आहे.
- आस्तिककुमार पाण्डेय, महापालिका आयुक्त
लॉकडाऊनमध्ये काहीही बदल होणार नाहीत
सोशल मीडियात काहीही अफवा पसरू द्या, शासनाच्या आदेशाने लॉकडाऊन जसे सुरू आहे, तसेच राहणार. त्यामध्ये काहीही बदल होणार नाही. ३० जूनपर्यंत लॉकडाऊनमध्ये बदल होण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही, तसेच शासनाकडून अद्याप यासंबंधीच्या काहीही सूचना आलेल्या नाहीत. नागरिकांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी स्वत:च काळजी घ्यावी. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर शहरातील सर्व बाजारपेठांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मोकळीक देण्यात आली आहे. या सवलतीमुळे बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी वाढली आहे. असे असले तरी शहर व जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये कोणतेही बदल होणार नाहीत. नागरिकांची स्वत:ची काळजी घ्यावी. मास्क घालावा, सोशल डिस्टन्सिंंंग पाळावे. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, गर्दीत जाऊ नये. कोरोनाच्या नियंत्रणासाठी शासनाने जे नियम घालून दिलेले आहेत, त्यांचे काटेकोरपणे पालन करावे.
- उदय चौधरी, जिल्हाधिकारी
लॉकडाऊनचा निर्णय मनपा आयुक्तांचा
शहरातील लॉकडाऊनसंदर्भात राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे निर्णय घेण्याचा अधिकार महापालिका आयुक्तांचा आहे. ते यासंदर्भात निर्णय घेऊ शकतात. आम्ही लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासंदर्भात भूमिका पार पाडत आहोत. सध्या तरी लॉकडाऊन नेहमीप्रमाणेच राहील, असे दिसत आहे.
- चिरंजीव प्रसाद, पोलीस आयुक्त
नियमांचे पालन :
- शहरात सम- विषम पद्धतीने दैनंदिन व्यवहार सुरळीत होत असून, ही पद्धत व्यापाऱ्यांनीदेखील स्वीकारली आहे. व्यापारी ग्राहक तसेच स्वत:च्या आरोग्याविषयी जागरूक असून, त्या पद्धतीने अनलॉकच्या नियमांचे पालन होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. शहरातील दुकानदारांनी व्यवहार सुरू केले आहेत.
- अनेक लहान-मोठ्या दुकांनासमोर सॅनिटायझरची बाटली लटकवलेले लोखंडी स्टँड दिसत आहेत. काही दुकानांत सुरक्षारक्षक, तर काही दुकानांत खास कर्मचाऱ्यांकडून प्रत्येक ग्राहकाची थर्मल गनने तपासणी केली जात आहे. त्यानंतर सॅनिटायझरने हात स्वच्छ केल्यानंतरच ग्राहकांना दुकानात प्रवेश दिला जात आहे.