'मिशन नॅक' पूर्ण, आता ऑनलाइन मूल्यांकन, उत्तरपत्रिकांची विद्यापीठात छपाईचे टार्गेट: कुलगुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 12:10 IST2025-01-25T12:08:04+5:302025-01-25T12:10:24+5:30
कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांचा वर्षपूर्तीनिमित्त संवाद

'मिशन नॅक' पूर्ण, आता ऑनलाइन मूल्यांकन, उत्तरपत्रिकांची विद्यापीठात छपाईचे टार्गेट: कुलगुरू
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा पदभार स्वीकारला. त्यास शुक्रवारी वर्ष पूर्ण झाले. या वर्षभराच्या काळात विद्यापीठामध्ये किती तरी कामे करण्यात आली. त्यातून विद्यापीठाचा गाडा रुळावर आणण्यास मदत झाली आहे. आता आगामी काळात विद्यार्थ्यांची संख्या, ऑनलाइन मूल्यांकन आणि परीक्षेसाठी लागणाऱ्या उत्तरपत्रिकांची छपाई विद्यापीठातच करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आल्याची माहिती कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विद्यापीठातील व्यवस्थापन परिषदेच्या सभागृहात वर्ष पूर्ण झाल्याबद्दल डॉ. फुलारी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रकुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर, वित्त व लेखाधिकारी सविता जंपावाड, डॉ. संजय कवडे, डॉ. संजय शिंदे यांची उपस्थिती होती. कुलगुरू म्हणाले, २४ जानेवारी २०२४ रोजी पदभार घेतल्यानंतर पहिली बैठक ‘नॅक’च्या संदर्भात होती. त्यानंतर मिशन नॅक पूर्ण केले. त्यात विद्यापीठाला अभूतपूर्व यश मिळाले. ‘ए प्लस’ दर्जा मिळाला. त्याशिवाय नॅशनल इन्स्टिट्यूशनल रॅंकींग फेमवर्कमध्येही विद्यापीठास ४६ वे रॅंकिंग मिळाले. त्याविषयी केंद्र शासनाच्या ‘पीएम-उषा’अंतर्गत १०० कोटी रुपये मिळाले. केमिकल टेक्नॉलॉजी विभागाला एनबीएचे मानांकन मिळाले. राज्य शासनाने छत्रपती शिवाजी अभ्यास केंद्राला ३ कोटींचा निधी मंजूर झाला. त्याशिवाय दीक्षांत सोहळा, इंद्रधनुष्य, आविष्कार, केंद्रीय युवा महोत्सव उत्साहात पार पडले. प्राध्यापक, कर्मचाऱ्यांना पदोन्नती, रजा रोखीकरण, सेवक कल्याण निधी, विद्यार्थी कलावंतांचा दैनंदिन भत्ता १२० वरून ३०० रुपये करण्यात आला. तासिका तत्त्वावर नेमणूक न करता पूर्णवेळ प्राध्यापकांच्या नियुक्त्याही वर्षभरात केल्या.
परीक्षा संचालक कायम राहणार
विद्यापीठाच्या परीक्षा संचालक डॉ. भारती गवळी यांनी राजीनामा दिल्याविषयी विचारले असता, राजीनामा स्वीकारण्यात येणार नसल्याचे फुलारी यांनी स्पष्ट केले. त्याच वेळी व्यवस्थापन परिषद सदस्याची अरेरावी वाढत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी योग्य ती कारवाई होईल, असे स्पष्ट करतानाच ‘सब्र का फल मिठा होता हैं’, असे स्पष्ट केले.
शैक्षणिक वातावरण कायम राहील
विद्यापीठातील प्रत्येक व्यक्ती काम करीत आहे. त्यामुळे वातावरण अतिशय चांगले बनले असून, आगामी काळातही शैक्षणिक वातावरण कायम ठेवण्यात येईल.
- डॉ. विजय फुलारी, कुलगुरू.