विधानसभेसाठी रासपचे मिशन-५०
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 12:24 AM2018-01-06T00:24:18+5:302018-01-06T00:24:26+5:30
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्टÑीय समाज पक्षाने मिशन-५० आखले आहे; पण हे मिशन पूर्ण करण्यासाठी आपण कमी पडता कामा नये, याची काळजी घ्या आणि ताकदीने कामाला लागा, असा सल्ला आज येथे राष्टÑीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्टÑीय समाज पक्षाने मिशन-५० आखले आहे; पण हे मिशन पूर्ण करण्यासाठी आपण कमी पडता कामा नये, याची काळजी घ्या आणि ताकदीने कामाला लागा, असा सल्ला आज येथे राष्टÑीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी दिला.
ते नक्षत्रवाडी येथील सद्गुरू शिवनंद लॉन्सवर आयोजित रासपच्या राज्यस्तरीय परिषदेत मार्गदर्शन करीत होते. राज्यभरातून पदाधिकारी व कार्यकर्ते या परिषदेला आले होते; परंतु जानकर यांनी आपल्या पद्धतीने चिरफाड करीत वरिष्ठ पदाधिकाºयांचे कान टोचले. पक्षासाठी आपले योगदान काय, हे प्रत्येकाने तपासले पाहिजे, असे ते म्हणाले.
महाराष्टÑात ३८ जिल्हे आहेत. आज या परिषदेला रासपचे किती जिल्हाध्यक्ष आले आहेत, किती महिला अध्यक्षा आलेल्या आहेत आणि किती युवक अध्यक्ष आलेले आहेत, असे सवाल उपस्थित करून जानकर यांनी त्यांना उभे राहावयास सांगितले आणि त्यांची संख्या मोजून घेतली. ते असमाधानकारक असल्याचा शेरा मारीत पक्षाचे मुख्य महासचिव बाळासाहेब दोडतले यांना मिशन-५० कसे पूर्ण करणार? असा सवाल केला.
‘भाजपने आता पेजप्रमुखाची संकल्पना पुढे आणली आहे आणि आपल्या पक्षाला अद्याप जिल्हाध्यक्ष नसतील, तर ही बाब योग्य नसल्याचे मत त्यांनी मांडले.
एस.एल. अक्कीसागर यांची रासपच्या राष्टÑीय अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
या परिषदेत दोडतले, डॉ. उज्ज्वला हाके, राजाभाऊ फड, श्रद्धा भातंब्रेकर, दादासाहेब केतकर, सुमित त्रिवेदी, अजित पाटील, गजानन चौगुले, दशरथ लोहबंदे, सुभाष राजपूत, अंकुश काळदाते, अशोक लांडे, पूजा नवनाथ शिंदे, प्रतिभा डोंगरे, सुरेश संबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाध्यक्ष सुरेश कटारे यांनी सूत्रसंचालन केले. नंतर जानकर यांनी पंगतीत बसून सर्वांबरोबर भोजन घेतले.
जानकर प्रेक्षकांमध्येच बसून
४संपूर्ण कार्यक्रम होईपर्यंत महादेव जानकर हे प्रेक्षकांमध्येच बसून होते. परिषदेचे उद्घाटनही त्यांनी पदाधिकाºयांच्या हस्ते होऊ दिले, पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागतही परिषेदचे अध्यक्ष एस.एल. अक्कीसागर हेच करीत होते. सर्व वक्त्यांची भाषणेही त्यांनी ऐकली; पण ती खाली प्रेक्षकांमध्ये बसूनच! ते विचारपीठावर गेले ते फक्त भाषण करण्यासाठी! खाली प्रेक्षकांमध्ये बसलेले असताना त्यांना भेटण्यासाठी जे कुणी येत होते, त्यांनाही ते इशाºयानेच कार्यक्रमाकडे लक्ष देण्याची सूचना करीत होते.