अभ्यासक्रमाविषयीचे गैरसमज अन ५ वर्षांत पडली अनेक डी.एड. महाविद्यालये बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 07:58 PM2020-12-19T19:58:37+5:302020-12-19T20:01:32+5:30
महाविद्यालयात ३५ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
- रुचिका पालोदकर
औरंगाबाद : बी. एड. अभ्यासक्रमाच्या जागा पूर्ण भरलेल्या तर डी. एड. अभ्यासक्रमाच्या जागा अर्ध्याहून अधिक रिक्त अशी विरोधी परिस्थिती सध्या डी. एड. आणि बी. एड. महाविद्यालयांमध्ये आहे. डी. एड. अभ्यासक्रमाविषयीचे गैरसमज हे त्याचे एक प्रमुख कारण असल्याचे मत शिक्षण क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केले.
२०१५ साली औरंगाबाद जिल्ह्यात एकूण ८२ डीएड महाविद्यालये होती. आता यापैकी निम्मी महाविद्यालये विविध कारणांमुळे बंद करण्यात आली. डाएट केंद्राकडून डी. एड. महाविद्यालयाचा कारभार पाहण्यात येतो. वेगवेगळ्या कारणांमुळे डाएटच्या नियमावलीत न बसणारी अनेक महाविद्यालयेही बंद आहेत, हेदेखील महाविद्यालये बंद होण्याचे कारण आहे. शिक्षण क्षेत्रात झालेला आणखी एक महत्त्वपूर्ण बदल म्हणजे बी. एड. झालेल्या शिक्षकांना आता प्राथमिक वर्गांना शिकविण्याचीही मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे बी. एड. केले तर माध्यमिक आणि प्राथमिक, अशी दोन्ही दालने खुली होत असल्याने साहजिकच विद्यार्थ्यांचा ओढा बी. एड. कडे वाढला आहे. तसेच डी. एड. आता चार वर्षांचे होणार, डी. एड. अभ्यासक्रम बंद होणार, डी. एड. केले तर नोकरी मिळत नाही, अशा चुकीच्या चर्चेतून डी. एड. करणे म्हणजे निरर्थकच आहे, असा समज बहुसंख्य विद्यार्थ्यांचा झालेला आहे.
केवळ अनुदानासाठीच महाविद्यालये का
मोठमोठ्या इमारती आणि विद्यार्थ्यांअभावी रिकामे पडलेले वर्ग अशी सध्याच्या अनेक डी. एड. महाविद्यालयांची अवस्था आहे. या महाविद्यालयांच्या निम्म्याहून जास्त जागा रिकाम्या आहेत. त्यामुळे केवळ अनुदानासाठीच डी. एड. महाविद्यालये सुरू आहेत का, असा प्रश्नही अनेकांना पडला.
गैरसमजामुळे प्रवेश घटले
डी. एड. केल्यानंतर नोकरी मिळत नाही, डी. एड. केले तर काही भविष्य नाही किंवा डी. एड. आता बंद होणार आहे, असे डी. एड. विषयी अनेक गैरसमज आहेत. यामुळे विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाल्याने डी. एड. ला प्रवेश घेण्याचे प्रमाण घटले. इंग्रजी शाळा दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. या शाळांनाही प्रशिक्षित शिक्षकांचीच गरज आहे. त्यामुळे गुणवत्ता असेल तर संधी निश्चित मिळणारच.
- डॉ. सतीश सुराणा
शिक्षकी पेशा सोडला
डी. एड. केल्यानंतर अनेक वर्षे विनाअनुदानित शाळेत अत्यंत कमी पगारावर नोकरी करावी लागली. मिळणाऱ्या पगारातून कुटुंबाचा खर्च भागविणे कठीण जात होते. त्यामुळे आता शिक्षकी पेशा सोडला असून एका खाजगी कार्यालयात काम करत आहे.
- प्रविण सोनवणे