अनिर्बंध अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:37 AM2018-02-23T00:37:46+5:302018-02-23T00:37:52+5:30
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली सर्रास गैरप्रकार सुरू आहेत. या गैरप्रकारांमुळे समाजाचे सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे. यामागे काही शक्ती कार्यरत आहेत. यामुळे तरुणांना नैतिकता आणि नीतिमत्ताच्या माध्यमातून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गैरवापरांचे प्रकार टाळले पाहिजेत, असे वक्तव्य विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली सर्रास गैरप्रकार सुरू आहेत. या गैरप्रकारांमुळे समाजाचे सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे. यामागे काही शक्ती कार्यरत आहेत. यामुळे तरुणांना नैतिकता आणि नीतिमत्ताच्या माध्यमातून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गैरवापरांचे प्रकार टाळले पाहिजेत, असे वक्तव्य विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केले.
देवगिरी अभियांत्रिकी व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयात ‘क्वसार्स-२०१८’ या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले आहे. याचे उद्घाटन उज्ज्वल निकम यांच्या उपस्थितीत स्वयंचलित रोबोटच्या हस्ते झाले. यावेळी मंचावर उद्योजक ऋषी बागला, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण, उपाध्यक्ष शेख सलीम शेख अहमद, कोषाध्यक्ष डॉ.अविनाश येळीकर, सदस्य विवेक भोसले, त्र्यंबक पाथ्रीकर, महाविद्यालयाचे संचालक डॉ. उल्हास शिऊरकर, महोत्सवाचे समन्वयक डॉ. गजेंद्र गंधे आणि विद्यार्थी संसद समन्वयक डॉ. सत्यवान धोंडगे उपस्थित होते. यावेळी बोलताना उज्ज्वल निकम म्हणाले, प्रत्येक युवकाने मन:स्थिती बदलली तरच परिस्थिती बदलेल. राष्ट्रासाठी आपण काय करू शकतो हा विचार प्रत्येकाच्या मनात बसला पाहिजे. आपण मिळविलेल्या ज्ञानाचा उपयोग देशासाठी कसा होऊ शकतो, याकडे सर्वांनी लक्ष दिले पाहिजे, असेही निकम यांनी सांगितले. उद्योजक ऋषी बागला म्हणाले, प्रत्येकाने मनाची स्वच्छता राखली पाहिजे. ही स्वच्छता राखल्यानंतरच पुढील मार्ग निघतात. अगदी संकटात सापडलेले असतानाही मार्ग निघतो, असा विश्वास बागला यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. उल्हास शिऊरकर यांनी केले. स्नेहसंमेलनाचे समन्वयक डॉ. गजेंद्र गंधे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी प्रा.अनिल वाकणकर, प्रा. प्रकाश तौर, प्रा. संजय कल्याणकर, डॉ. राजेश औटी, प्रा. रुपेश रेब्बा आदी प्रयत्नरत आहेत.
गुणवंतांचा सत्कार
महाविद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात विविध पारितोषिके देऊन सत्कार करण्यात आला. यात भक्ती काळे या विद्यार्थिनीला महाविद्यालयात प्रथम आल्याबद्दल १५ हजार रुपये रोख आणि प्रमाणपत्र देऊन गौरविले. काश्मीर ते कन्याकुमारी अशी बेटी बचाव सायकल रॅली काढणाºया विद्यार्थ्यांचाही सत्कार केला.
स्वयंचलित रोबोटचे आकर्षण
महोत्सवाचे उद्घाटन स्वयंचलित रोबोटची पाहुण्यांनी कळ दाबताच झाले. रोबोट मंचाच्या मध्यभागी आल्यानंतर सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तेव्हा विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू हा रोबोटच ठरला. हा रोबोट संदेश सिंग, योगेश तावडे, शिवाजी थट्टीकोटा आणि अनिरुद्ध कुमार या विद्यार्थ्यांनी बनवला होता.