एकतर्फी प्रेमातून औरंगाबादेत मित्राचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 12:24 AM2018-04-06T00:24:16+5:302018-04-06T11:15:53+5:30
जयसिंगपुरा येथे वसतिगृहात राहणा-या तरुणाचा एकतर्फी प्रेमातून त्याच्याच मित्राने गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जयसिंगपुरा येथे वसतिगृहात राहणा-या तरुणाचा एकतर्फी प्रेमातून त्याच्याच मित्राने गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने मृताच्या रूममेटस्ने ‘गोल्याचा गेम केला’ असे सांगितले आणि तो थेट बेगमपुरा पोलीस ठाण्यात हजर झाला. एकतर्फी प्रेमातून शहरात पंधरा दिवसांत झालेली ही दुसरी हत्या आहे.
गोल्या ऊर्फ अजय शत्रुघ्न तिडके (२२,रा. रामेश्वर अपार्टमेंट, जयसिंगपुरा,मूळ रा. शहापूर, ता. खामगाव,जि. बुलडाणा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मंगेश सुदाम वायव्हळ (२७,रा. पुणे, मूळ रा.समसापूर,जि.परभणी) असे आरोपीचे नाव आहे. सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर म्हणाले की, अजय ऊर्फ गोल्या व आरोपी मंगेश पाच-सहा वर्षांपासून मित्र होते. अजय हा मिलिंद महाविद्यालयात बी.एस्सी.तृतीय वर्षात शिकत होता. आरोपी मंगेशचे शिक्षण शहरातच बीबीएपर्यंत झाले. दोन वर्षांपासून तो स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्याला राहत आहे. मंगेश आणि अजय हे चार वर्षे रूममेट होते. अजय हा मंगेशला मोठा भाऊ मानत. मंगेशही त्याला अभ्यासाविषयी सतत मार्गदर्शन करीत. दरम्यानच्या काळात अजयची एका मुलीशी मैत्री झाली. त्या मुलीला आरोपी ओळखत होता. तो तिला भेटलेला नव्हता. मात्र, अजयनेच स्वत:च्या फोनवरून तिचे आणि मंगेशचे बोलणे करून दिले होते. तेव्हापासून मंगेशला ती तरुणी आवडू लागली. मागील सहा महिन्यांपासून अजय आणि तिच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यांच्यात सतत होणाºया गप्पा आणि भेटीगाठीचे वर्णन अजय मंगेशला फोनवरून सांगायचा. मंगेशला मात्र अजय व त्या मुलीचे प्रेमसंबंध मान्य नव्हते. तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करू लागला होता. अजयला तिच्यापासून दूर करण्याच्या उद्देशाने तो ३१ मार्च रोजी पुण्याहून औरंगाबादेत आला. काही दिवस मित्राकडे राहिल्यानंतर दोन दिवसांपासून तो अजयच्या रू मवर आला.
रूमपार्टनरला पाठविले अन्य रूममध्ये
अजयचा काटा काढण्याच्या उद्देशाने त्याने पुण्याहून येताना एक विशिष्ट पद्धतीचा बेल्ट तयार करून सोबत आणला. रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास अजयशी खाजगी बोलायचे असल्याचे सांगून आरोपीने अजयचे रूमपार्टनर सचिन वानखेडे आणि अनिल भोजणे यांना शेजारच्या खोलीत पाठविले. यामुळे रूममध्ये दोघेच होते. मंगेशने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, अजयने त्या मुलीचा नाद सोडावा, यासाठी त्याने रात्री साडेअकरा ते बारा वाजेपासून अजयचे मन वळविण्याचा प्रयत्न सुरू केला होता. अनेकदा समजावून सांगूनही अजय ऐकत नसल्याने अखेर पहाटे साडेचार ते पाचच्या सुमारास मंगेशने सोबत आणलेल्या बेल्टने अजयचा गळा आवळला. अजयने त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र बेसावधपणे आवळलेल्या गळ्यातील फास त्याला काढता आला नाही. अजय निपचित पडल्यानंतरच मंगेशने त्याला सोडले.
खून करून ठाण्यात हजर..
अजयचा खून केल्यानंतर सुमारे पाऊण तास तो मृतदेहाजवळ बसून होता. पहाटे सव्वासहा वाजता तो रूममधून बाहेर पडला तेव्हा अन्य मुले अभ्यास करीत होते. त्यांना पाहून ‘गोल्याचा गेम केला, गोल्याचा गेम केला,’असे म्हणून तो थेट बेगमपुरा ठाण्यात गेला. ठाणे अंमलदार मोजेस कर्तव्यावर होते. त्यांनाही मंगेशने, मी मित्राचा खून करून आलो, असे सांगितले. पोलिसांनी त्याला बसविले आणि घटनेची माहिती पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांना दिली.
मंगेश सकाळी-सकाळी मस्करी करीत असेल, असे मुलांना वाटले. मात्र, त्यांच्यापैकी काहींनी रूममध्ये जाऊन पाहिले, तर अजय ऊर्फ गोल्या निपचित पडलेला दिसला. त्यांनी त्याला उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो मृत असल्याचे स्पष्ट झाल्याने ते लगेच पळतच पोलीस ठाण्यात गेले. तेव्हा त्यांना तेथे मंगेश बसलेला दिसला.