आदित्य ठाकरे एक उच्चशिक्षित युवा नेतृत्व; ते अत्यंत हुशार आहेत- इम्तियाज जलील
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 07:22 PM2022-10-28T19:22:28+5:302022-10-28T19:22:36+5:30
अब्दुल सत्तार यांच्या विधानावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आदित्य ठाकरेंनी टाटांचा प्रकल्प बाहेर कसा गेला? तारीख कोणती होती? हे बारकाईनं पाहिलं तर २१ सप्टेंबर २०२१ मध्ये हा प्रकल्प राज्यातून गेला. त्यावेळेला मुख्यमंत्री यांचे वडील होते. जे बोलतायेत ते कॅबिनेट मंत्री होते. मग या प्रकल्पात काही देवाणघेवाण झाली नाही म्हणून हा प्रकल्प राज्याबाहेर गेला? अशी शंका लोकांमध्ये आहे. छोटा पप्पू पहिले बोलले असते तर आज ही वेळ आली नसती असं सांगत मंत्री अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे.
राजकारण वेगळं आहे. तुम्ही कॅबिनेट मंत्री, तुमचे वडील मुख्यमंत्री आणि २०२१ मध्ये हा प्रकल्प गुजरातला जातो. आपल्यावरील खापर दुसऱ्याच्या माथी मारायचं. हे सर्व पाप २०२१ मधील आहे. एकनाथ शिंदे २०२२ मध्ये मुख्यमंत्री झाले. लोकांमध्ये दिशाभूल निर्माण करायचं. संभ्रमाचं वातावरण बनवायचं असं राजकारण केले तर दुसरे पप्पू म्हणून यांची जागा कुठे असेल सर्वांना माहिती आहे, अशी टीका अब्दुल सत्तार यांनी केली होती.
अब्दुल सत्तार यांच्या या विधानावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे हे एक उच्चशिक्षित युवा नेतृत्व आहे. त्यांच्याबद्दल असे कुणीही बोलणे योग्य नाही. मी स्वतः आदित्य ठाकरेंना भेटलोय. त्यांचं अत्यंत हुशार असा व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे अशा भाषेत त्यांच्याबाबत बोलणं कधीही न पटणारं आहे, असं मत इम्तियाज जलील यांनी व्यक्त केलं आहे.
दरम्यान, पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी अब्दुल सत्तार औरंगाबाद दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दारू पिता का?, असा प्रश्न विचारला. यावर देखील इम्तियाज जलील यांनी टीका केली आहे. अब्दुल सत्तार यांचं हे वक्तव्य शोभणारं नाही. तुमचा २० आणि ३० मिनिटे दौरा करुन काहीही फायदा नाही, असंही इम्तियाज जलील यांनी म्हटलं.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"