आमदारांना करावी लागली तहसीलदारांची तासभर प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 07:16 PM2019-06-04T19:16:29+5:302019-06-04T19:20:08+5:30

या पद्धतीने काम चालले तर दुष्काळ सुसह्य होण्याऐवजी अधिक असह्य होण्याचीच शक्यता आहे.

MLA Chikatgaonkar had an hour waiting for Tahsildar of Vaijapur | आमदारांना करावी लागली तहसीलदारांची तासभर प्रतीक्षा

आमदारांना करावी लागली तहसीलदारांची तासभर प्रतीक्षा

googlenewsNext
ठळक मुद्देतहसीलदार काही कामानिमित्त बाहेर गेले होतेदालनाच्या बाजूला एका कर्मचाऱ्याचा वाढदिवस इतर कर्मचारी साजरा करीत होते.

वैजापूर (औरंगाबाद ) : दुष्काळात महत्त्वाची भूमिका बजावण्याची जबाबदारी असलेले महसूल प्रशासन किती तत्परतेने काम करते, हे सोमवारी तहसील कार्यालयाच्या आवारात कार्यालयीन वेळेत दिसून आले. यावेळी सामान्य नागरिकांप्रमाणे चक्क आ. भाऊसाहेब पा. चिकटगावकर यांनाही तहसीलदारांची भेट घेण्यासाठी एक तास ताटकळावे लागल्याचे समोर आले. हे वास्तव प्रशासनाच्या एकूण कार्यतत्परतेवर प्रश्न निर्माण करणारे तर आहेच; पण या पद्धतीने काम चालले तर दुष्काळ सुसह्य होण्याऐवजी अधिक असह्य होण्याचीच शक्यता आहे.

सोमवारी तहसील कार्यालयात लोकप्रतिनिधींचा एक वेगळा अनुभव वैजापूरकरांना पाहायला मिळाला. दुपारी ३ वाजता तहसील कार्यालयात अचानक आ. चिकटगावकर यांची एंट्री झाल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. आ. चिकटगावकर जेव्हा तहसील कार्यालयात आले तेव्हा तहसीलदारांच्या दालनाला कुलूप लावलेले होते, तर तहसीलदारांच्या दालनाच्या बाजूला एका कर्मचाऱ्याचा वाढदिवस इतर कर्मचारी साजरा करीत होते. त्यामुळे आमदारांना तहसीलदारांच्या बंद दरवाजासमोर दहा मिनिटे ताटकळत उभे राहावे लागले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या आमदारांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावून वैजापूर तहसील कार्यालयात सुरू असलेल्या कारभारासंदर्भात माहिती दिली व महसूल अधिकाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावले. त्यानंतर एका शिपायाने तहसीलदारांच्या दालनाचे कुलूप उघडून आमदारांना दालनात बसविले व तहसीलदार विनोद गुंडमवार यांना माहिती दिली. 

विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांनी साहेबांना फोन लावल्यानंतरही तहसीलदार तब्बल ४० मिनिटांनंतर कार्यालयात आले. त्यामुळे  चिकटगावकर यांना जवळपास एक तास त्यांची प्रतीक्षा करावी लागली. तालुक्यात सध्या दुष्काळी अनुदान वाटप सुरू आहे. मात्र, बहुतांश गावांत तलाठ्यांच्या चुकांमुळे शेतकऱ्यांचे अनुदान जमा झालेले नाही, तर काही शेतकऱ्यांचे अनुदान दुसऱ्याच्या खात्यावर जमा झाले आहे. याविषयी शेतकरी तलाठ्यांना जाब विचारत आहेत. मात्र, तलाठी अरेरावीची भाषा करून वेळ मारून नेतात. म्हणून संतापलेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी आ. चिकटगावकर यांची भेट घेऊन समस्या मांडल्या. त्यामुळे ते थेट दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास तहसील कार्यालयात दाखल झाले.

तहसीलदार काही कामानिमित्त बाहेर गेले होते, तर काही अधिकारी आपल्या जागेवर उपस्थित नव्हते. गोरगरीब जनतेच्या कामांना प्राधान्य द्या; पण अशा कामात विलंब करू नका. आपल्या कार्यालयाच्या भिंती दगडाच्या आहेत म्हणून मनही दगडाचे करू नका. गोरगरिबांसाठी संवेदनशील बना, असे खडेबोल सुनावत महसूल प्रशासन लोकाभिमुख व गतिमान करण्याची सूचना महसूल अधिकाऱ्यांना आ. चिकटगावकर  यांनी दिली. त्याचवेळी आमदार तहसील कार्यालयात आल्याचे समजताच काही विद्यार्थी व नागरिक तेथे जमा झाले होते. त्यामुळे अधिकऱ्यांना सूचना करीत आ. चिकटगावकर तहसील कार्यालयातून बाहेर पडले. सर्वसामान्य जनतेला बाहेर तासन्तास रखडवणे येथील तहसील कार्यालयाचा नित्याचा उपक्रम झाला आहे. सकाळी १० वाजता आलेल्या नागरिकांचे संध्याकाळी ५ वाजले तरी काम होत नसल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांनी माझ्याकडे केल्या आहेत. विशेष म्हणजे आज मलाच शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी एक तास ताटकळावे लागल्याचा अनुभव आला, असे चिकटगावकर यांनी सांगितले.

अनागोंदी कारभार चव्हाट्यावर 
वैजापूर तहसील कार्यालयाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे. तालुक्यातील १६४ गावांतील नागरिक आपल्या महसुली कामासाठी या ठिकाणी येतात. मात्र, कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी म्हणजे मतिमंदाची शाळा असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. एकही अधिकारी किंवा कर्मचारी वेळेवर काम करीत नसल्याने ‘आंधळ्याची वरात भिकाऱ्याच्या दारात ’ अशी अवस्था वैजापूर तहसील कार्यालयाची झाली आहे.  मतिमंद व्यक्तीप्रमाणे अधिकारी व कर्मचारी केवळ मान हलवून काम होणार की नाही, हे सांगत असतात.

Web Title: MLA Chikatgaonkar had an hour waiting for Tahsildar of Vaijapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.