अधिकाऱ्याविरोधात आ. बागडे आक्रमक, 7 तासांपासून ठिय्या; जेवणही कार्यालयात, मुक्कामावर ठाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 21:35 IST2023-06-22T21:33:02+5:302023-06-22T21:35:04+5:30
गेल्या एका वर्षापासून सिंचन विहीर व गोठ्याच्या फाईल मंजूर होत नसल्याने मेटाकुटिला आलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला आमदार हरिभाऊ बागडे धावून आले.

अधिकाऱ्याविरोधात आ. बागडे आक्रमक, 7 तासांपासून ठिय्या; जेवणही कार्यालयात, मुक्कामावर ठाम
फुलंब्री : येथील पंचायत समिती कार्यालयात मागील एक वर्षापासून दाखल केलेल्या सिंचन विहीर व गोठ्याच्या तब्बल ७०० फाईल धूळखात पडून आहेत. या फाईल मंजूर होत नसल्याने मेटाकुटिला आलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला आमदार हरिभाऊ बागडे धावून आले. आज दुपारी पंचायत समिती कार्यालयात धाव घेत आ. बागडे यांनी गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी यांना प्रलंबित फाईलबाबत जाब विचारत चांगलीच खरडपट्टी काढली.
विशेष म्हणजे, दुपारी 2 वाजेपासून बागडे यांनी फुलंब्रीच्या पंचायत समिती कार्यालयात आपल्या कार्यक्रर्त्यांसह ठिय्या मांडला आहे. त्यांनी रात्रीचे जेवणही कार्यालयातच केले. जोपर्यंत लाभार्त्याच्या फाईली मंजूर होत नाहीत, तोपर्यंत जाणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.
सविस्तर बातमी- 'पैसे द्या म्हणून बोर्ड लावा', आमदार बागडे अधिकाऱ्यावर संतापले; कार्यालयात ठिय्या
विहीर मंजुरीसाठी गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी यांनी लाच मागितल्याने सरपंचाने पंचायत समिती कार्यालय बाहेर नोटा फेकल्याची घटना दोन महिन्यांपूर्वी घडली होती. त्यानंतर येथील कारभार चव्हाट्यावर आला. शेतकऱ्यांनी तक्रारी करत वर्क ऑर्डर आलेल्या फाईल देखील गटविकास अधिकारी अडवून ठेवत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.
त्यानंतर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी यांना निलंबित करणार असल्याचे जाहीर केले. मात्र, त्या अद्यापही कर्तव्यावर आहेत. राज्यभर गाजलेले नोटांची उधळणे प्रकरण, मंत्री महाजन यांनी दखल घेऊन देखील कवडदेवी यांचा कारभार सुधारला नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला. काही शेतकऱ्यांनी याबाबत आमदार हरिभाऊ बागडे यांना तक्रार केली. आ. बागडे यांनी दखल घेत आज पंचायत समिती कार्यालय गाठले. येथे गटविकास अधिकारी कवडदेवी यांना प्रलंबित फाईलबाबत जाब विचारला, दुपारी दोन वाजेपासून बागडे यांनी येथे ठिय्या दिला आहे.