‘मातोश्री’ वरून फोन येताच आमदार जाधव यांना आले हत्तीचे बळ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 01:27 PM2017-11-16T13:27:21+5:302017-11-16T13:37:53+5:30
शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राज्य सरकारमधील शक्तिशाली मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर केलेल्या खळबळजनक आरोपांमुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले. हे आरोप करण्याअगोदर आ. जाधव यांनी पक्षप्रमुखांना कल्पना दिलेली नव्हती.
- राम शिनगारे
औरंगाबाद : शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राज्य सरकारमधील शक्तिशाली मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर केलेल्या खळबळजनक आरोपांमुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले. हे आरोप करण्याअगोदर आ. हर्षवर्धन जाधव यांनी पक्षप्रमुखांना कल्पना दिलेली नव्हती. यामुळे पक्षप्रमुख काय बोलणार? या तणावात जाधव होते. मात्र ‘मातोश्री’चा सकारात्मक आशीर्वाद मिळताच जाधव यांच्या अंगात हत्तीचे बळ संचारले. त्यांच्या चेह-यावरील आनंद ओसंडून वाहत होता.
कन्नड-सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राज्याचे बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी ५ कोटी रुपयांची आॅफर दिल्याचा गौप्यस्फोट वृत्तवाहिन्यांशी बोलताना केला. यानंतर काही वेळातच आ. जाधव यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. आ. जाधव समोरच्या सिंगल सोफ्यावर थोडेसे तणावातच बसलेले दिसले. लोकमत प्रतिनिधीशी संवाद सुरू असतानाच आ. जाधव यांच्या भ्रमणध्वनीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मातोश्रीवरून दूरध्वनी आला. मोबाईलची रिंग वाजत असतानाच आ. जाधव यांच्या चेह-यावर प्रचंड तणाव असल्याचे दिसले. त्यांनी सर्वांना शांत राहायला सांगितले. तेव्हा समोरून बोलताना पक्षप्रमुखांनी भाजपचा भंडाफोड केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. तेव्हाच त्यांच्या चेह-यावरील सर्व तणाव दूर झाला. आता टीव्हीसाठी दिलेली ‘बाईट’ पुरेशी आहे. पुढे काहीही बोलू नका. झाले तेवढे पुरे आहे, अशा सूचनाही पक्षप्रमुखांनी दिल्याचे समजते.
पक्षप्रमुखांच्या प्रत्येक प्रश्नावर आ. जाधव खुलासा करीत होते. शेवटी रविवारी (दि.१२) झालेल्या कार्यक्रमाविषयी मतदारसंघात काय प्रतिक्रिया आहे? असा प्रश्न पक्षप्रमुखांनी केला. यावर जाधव यांनी माझ्या वडिलांचे आपण केलेले गुणगान सर्वांना भावले. जनतेला कार्यक्रम आवडला. सर्वत्र चांगलीच प्रतिक्रिया उमटली असल्याचे सांगिल्यानंतर बोलणे संपले. हे बोलणे संपताच हर्षवर्धन जाधव यांच्या आनंदाला उधाण आले. आता कोणाच्याही बापाला भीत नाही, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया पाहायला मिळाली.
पक्षप्रमुख काय बोलतील? हीच चिंता होती. एकदाचा सकारात्मक सिग्नल मिळाला. चिंता दूर झाली म्हणत समोरच्या पोर्चमधून दोन मिनिटात आत जाऊन येतो, असे सांगत घरातील मंडळींना बातमी सांगण्यासाठी गेले. आतमधून पुन्हा बाहेर आल्यानंतर आ. जाधव यांनी अगदी मनमोकळेपणाने सर्व विषयांवर संवाद साधला. पक्षाचा आशीर्वाद मिळाला नसता, तर माझाही गेम झाला असता, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. मंत्र्यांच्या आॅफर घेण्यापेक्षा जनतेची कामे केली तर आपली नोकरी (आमदारकी) कायम राहील. जनतेची कामे करून नोकरी कायम ठेवण्यावर माझा भर असल्याचेही त्यांनी सांगितले. मोठ्या संकटाचा सामना करण्यासाठी मोठ्यांचे आशीर्वाद मिळाल्याचे सूचक वक्तव्यही आ. जाधव यांनी केले.
जिल्ह्यातील लोकांशी स्पर्धा नाही
शिवसेनेच्या जिल्ह्यातील नेत्यांशी आपली स्पर्धा नाही. आपण शक्तिशाली लोकांना (चंद्रकांत पाटील) खेटू शकतो तर इतरांचे काय? असा सूचक इशारा देतानाच जनतेची साथ असल्यामुळे आपण हे धाडस करूशकतो. आगामी काळातही जनतेचे प्रश्न सोडवून अशा पद्धतीचे धाडस करण्यास तयार असल्याचेसुद्धा सांगायला आ. जाधव विसरले नाहीत.
‘मातोश्री’वर वजन वाढले
शिवसेना-भाजपतील मतभेद टोकाला पोहोचले असतानाच आ. जाधव यांनी भाजपच्या मंत्र्यांवर बॉम्बगोळा टाकला. याचा पक्षाला मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे. भाजपची प्रतिमा राष्ट्रीय स्तरावर मलिन करण्यासाठी याचा उपयोग होणार असल्यामुळे जाधवांचे ‘मातोश्री’वरील वजन चांगलेच वाढले आहे.
तिकिटाचा प्रश्नच निर्माण होत नाही
शिवसेना पक्षप्रमुखांचा कन्नड दौरा झाल्यानंतर नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेल्या उदयसिंग राजपूत यांच्या समर्थकांमध्ये चलबिचल सुरू आहे. एका व्हॉटस्अॅप ग्रुपमध्ये राजपूत समर्थक त्यांनाच शिवसेनेचे कन्नड-सोयगाव मतदारसंघाचे तिकीट मिळणार असल्याचा दावा करीत असल्याचे लोकमत प्रतिनिधींनी आ. जाधव यांच्या निदर्शनास आणून दिले. आ. जाधव म्हणाले की, हा विषयच होऊ शकत नाही. शिवसेना पक्षप्रमुख केवळ पुस्तक प्रकाशन सोहळ्याला जर कन्नडसारख्या ठिकाणी येत असतील तर सर्वांनी यातूनच योग्य तो संदेश घेतला पाहिजे. पुन्हा त्यावर मी काही मत व्यक्त करण्याची गरज नाही. पक्षप्रमुखांचे कन्नडला येणे हा उदयसिंग राजपूत यांना अप्रत्यक्षपणे इशाराच असल्याचे आ. जाधव यांनी स्पष्ट केले.