आमदार, खासदार, मंत्री शिवसेनेचा तरीही औरंगाबादमधील बायपासचा प्रश्न कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 12:32 PM2018-09-03T12:32:04+5:302018-09-03T12:33:16+5:30
बीड बायपासला सर्व्हिस रोड, संग्रामनगर उड्डाणपूल, शिवाजीनगरचा भुयारी मार्ग नसल्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतून सतत अपघात होत आहेत.
- राम शिनगारे
औरंगाबाद : बीड बायपासला सर्व्हिस रोड, संग्रामनगर उड्डाणपूल, शिवाजीनगरचा भुयारी मार्ग नसल्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतून सतत अपघात होत आहेत. नागरिकांचा यात नाहक बळी जात असून, शासकीय, राजकीय पातळीवर काहीही होत नाही. या भागाचे आमदार, खासदार, महापौर शिवसेनेचे आहेत. राज्याचे सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्रीपदही शिवसेनेकडेच आहे. तरीही हा प्रश्न सोडविण्यात सेना नेते अपयशी ठरले आहेत. नव्हे त्यांचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.
बीड बायपासवर सर्व्हिस रोड नाही. रस्त्यावर अतिक्रमणे झालेली आहेत. राजकीय वरदहस्तामुळे ही अतिक्रमणे महापालिका तोडत नाही. यातच बीड, नागपूरकडे जाणारी सर्व अवजड वाहतूक याच रस्त्यावरून होत असल्यामुळे सतत दुचाकीस्वारांचे अपघात होतात. मागील महिनाभरापासून तर अपघातांची मालिकाच सुरू आहे. याशिवाय बीड बायपासवर सतत ट्रॅफिक जाम होत आहे. याचा त्रास सर्वांनाच सहन करावा लागत आहे. बीड बायपासचे रुंदीकरण, सर्व्हिस रस्ता, लिंक रस्ता आणि पैठण रस्त्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.
सर्वच सत्तापदे शिवसेनेकडे असली तरीही हा प्रश्न सुटत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रश्न सोडविण्यासाठी लागणारी इच्छाशक्तीच शिवसेना नेतृत्वाकडे नसल्याचा प्रत्यय वारंवार येत आहे. शुक्रवारी बायपासवर भीषण अपघात झाला. हा अपघात होताच शिवसेना आमदार संजय शिरसाट हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनाही जनतेच्या रोषाचा सामना करावा लागला. तेव्हाच पोलीस यंत्रणाही दाखल झाली. पुन्हा एकदा वाहतुकींचे नियम पाळण्यासाठी मोहीम उघडण्याचा निर्णय घेतला. मात्र दुसऱ्याच दिवशी परिस्थिती ‘जैसे थे’. बेशिस्त वाहतूक, अवजड वाहनांची गर्दी दिसून आली.
तिसऱ्या दिवसांपासून अवजड वाहतूक सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ८ या वेळेत बंद करण्याचा निर्णय झाला. हा निर्णयही पहिल्याच दिवशी अपयशी ठरल्याचे चित्र पाहायला मिळाले. बीड बायपास रस्त्याचा प्रश्न सोडविण्यासाठी राजकीय इच्छाशक्तींचा अभाव आहे. हा रस्ता भाजपचे प्रदेशाध्यक्ष व जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांच्याही मतदारसंघात येतो. त्यांनीही याकडे दुर्लक्षच केलेले आहे. शिवसेना नेते व खासदार चंद्रकांत खैरे यांचेही त्याकडे लक्ष नाही. आ.संजय शिरसाट यांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी विधिमंडळ, शासन दरबारी किती वेळा आवाज उठविला. हा संशोधनाचाच भाग आहे.
सातारा, देवळाई भागात दोन वर्षांपूर्वी महापालिकेच्या निवडणुका झाल्या. यात शिवसेनेचे पानिपत झाले. तेव्हापासून शिवसेनेने या भागाकडे दुर्लक्ष केले आहे. राजकीय कुरघोडीपायी सर्वसामान्य नागरिकांचे बळी जात आहेत. त्याचे कोणालाही सोयरसुतक नसल्याचे चित्र आहे. आता काही दिवसांवर आलेल्या निवडणुका पाहता सर्वच राजकीय पक्षांना हा प्रश्न सोडविण्याचा पुळका येईल. आश्वासनांची खैरात केली जाईल. मात्र त्यातून काहीही होणार नाही. हे आतापर्यंतच्या कर्तृत्वावरून गृहीतच धरावे लागणार आहे.
१५० कोटीतून बायपासचे रुंदीकरण का नाही
राज्य सरकारने शहरातील रस्ते विकासासाठी १५० कोटी रुपये दिले आहेत. या पैशातून सातारा-देवळाईसह शिवाजीनगर, प्रतापनगर, मुस्तफाबाद, एमआयटी कॉलेज परिसर, रेल्वेस्टेशन परिसरातील नागरिकांनाही या रस्त्याचा नियमित वापर करावा लागतो. यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी १५० कोटीतून हा रस्ता का केला जात नाही, असा सवालही उपस्थित होत आहे.