आमदार-खासदार पुत्रांचे राजू वैद्य यांच्याविरुद्ध बंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 01:08 AM2018-09-04T01:08:52+5:302018-09-04T01:09:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : शहरातील ३०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यास चार दिवसांपूर्वीच एकमुखी मंजुरी देणा-या स्थायी समितीच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरातील ३०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यास चार दिवसांपूर्वीच एकमुखी मंजुरी देणा-या स्थायी समितीच्या १६ पैकी १३ सदस्यांनी सभापती राजू वैद्य यांच्या विरोधात सोमवारी बंडाचा झेंडा फडकावला. ३६ कोटी रुपयांचा मंजूर ठराव तूर्त सर्वसाधारण सभेकडे पाठवावा, अशी मागणी सदस्यांनी आयुक्तांकडे केल्याने पालिका वर्तुळात खळबळ उडाली. उल्लेखनीय बाब म्हणजे सभापतीही सेनेचे असून असंतुष्ट सदस्यांमध्ये सेनेच्या
खासदार आणि आमदार पुत्रांचा समावेश आहे.
वाळूज येथील मायोवेसल कंपनीने ३०० मेट्रिक टन कच-यावर प्रक्रिया करण्याचे काम मिळविले. त्यासाठी स्थायी समितीची मंजुरी घ्यावी लागली. चार दिवसांपूर्वी मनपा प्रशासनाने तब्बल ३६ कोटी रुपयांचा प्रस्ताव समितीसमोर सादर केला. समितीनेही क्षणार्धात त्याला मंजुरी दिली. समितीमधील सर्वपक्षीय १३ सदस्यांनी सोमवारी अचानक आयुक्त, सभापती, नगरसचिव यांना एक पत्र दिले.
या पत्रात म्हटलेय की, मायोवेसल कंपनीवर अनेक आरोप आहेत. अमरावती महापालिकेत कंपनीला ब्लॅकलिस्ट केले आहे. नांदेड, नाशिक येथे कंपनीने घनकच-यात आजपर्यंत नेमके कसे काम केले याची प्रत्यक्ष पाहणी करावी. तोपर्यंत मंजूर ठराव स्थगित ठेवावा. प्रशासनाची शहानिशा झाल्यावर हा ठराव अंतिम मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेत पाठवावा.