मराठवाडा पाणी प्रश्नावर आमदार संजय शिरसाट यांचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा

By बापू सोळुंके | Published: November 5, 2023 07:54 PM2023-11-05T19:54:46+5:302023-11-05T19:54:55+5:30

 पाणी सोडण्यासाठी दरवेळी बैठकांची काय गरज

MLA Sanjay Shirsat's warning to take to the streets on the Marathwada water issue | मराठवाडा पाणी प्रश्नावर आमदार संजय शिरसाट यांचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा

मराठवाडा पाणी प्रश्नावर आमदार संजय शिरसाट यांचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा

छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळू नये,  यासाठी अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील  काही राजकीय  पुढारी जाणुनबूजन प्रयत्न करीत आहेत. आम्ही आमच्या हक्काचे पाणी मागतो, यामुळे सरकारने आमचा अंत पाहु नये, तात्काळ जायकवाडीच्या उर्ध्वभागातील धरणातून पाणी सोडावे, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल,अशा इशारा सत्ताधारी शिवसेना पक्षाचे प्रवक्ता तथा छत्रपती संभाजीनगर पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी दिला.  आ.शिरसाट यांनी त्यांचे हे आंदोलन सरकारविरोधात नसून नगर, नाशिक जिल्ह्यातील मराठवाडा द्वेषी पुढाऱ्यांविरोधात असल्याचे स्पष्ट केले.

आ. शिरसाट म्हणाले की, मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळावे, असा उच्च न्यायालयाचा निकाल आहे. असे असताना मराठवाड्याला पाणी मिळू नये,असे वाटणारे पश्चिम महाराष्ट्रातील काही राजकीय पुढारी  जाणूनबुजून  प्रयत्न करीत असल्याचे दिसते. आज जायकवाडी प्रकल्पात केवळ  ४५ टक्केच पाणीसाठा आहे. दोन महिन्यात हा साठा तळाला जाईल यानंतर  येणारा उन्हाळा मराठवाड्याचा विनाश केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आम्ही हक्काचे पाणी द्या, अशी विनंती सरकारला करीत आहोत. मराठवाड्याला पाणी देण्यात येऊ नये, यासाठी काही जण कोर्टात गेल्याचे समजल्याने  आम्हीही सोमवारी कॅव्हेट दाखल करणार आहोत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत पाणी प्रश्नावर बोलणे झाले. त्यांनी हक्काचे पाणी मिळेल असे सांगितले. पण दरवर्षी पाणी प्रश्नासाठी मराठवाड्याला भीक का मागावी लागते, हा आमचा प्रश्न असल्याचे त्यांनी नमूद केले. 

आता मराठवाड्यातील सर्वपक्षीय  आमदार, खासदारांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून  रस्त्यावरची लढाई लढावी लागेल. कोकणात वाहुन जाणारे पाणी मराठवाड्याला देण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात दोन धरणे बांधली जात असल्याचे तेथील नेते सांगतात.मात्र ही दोन धरणे बांधूच नाही,अशी आमची भूमिका असल्याचे आ. शिरसाट यांनी स्पष्ट सांगितले.

 पाणी सोडण्यासाठी दरवेळी बैठकांची काय गरज
मराठवाड्यात दरवर्षी होणाऱ्या १८ ते २० हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागचे पाणी हेच मूळ कारण आहे. यामुळे  सरकारला आमची हात जोडून विनंती आहे की, पाणी प्रश्नावर अंत पाहु नका, अन्यथा आमही सर्वजण रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही.  पाणी सोडण्यासाठी दरवेळी बैठक घेण्याची गरज काय,असा सवाल करीत बैठकीच्या नावावर पाणी उशीरा कसे सोडता येतील असा प्रयत्न केला जात असल्याचा आराेपही त्यांनी जलसंपदाच्या अधिकाऱ्यांवर केला. 

 

Web Title: MLA Sanjay Shirsat's warning to take to the streets on the Marathwada water issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.