कृषी मंत्री सत्तारांच्या कृषीमहोत्सवाला आमदार शिरसाटांची दांडी
By बापू सोळुंके | Published: January 1, 2023 10:30 PM2023-01-01T22:30:07+5:302023-01-01T22:30:14+5:30
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कृषी महोत्सवाचे उदघाटन समारंभ आयोजित केला होता.
औरंगाबाद:
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कृषी महोत्सवाचे उदघाटन समारंभ आयोजित केला होता. या समारंभाला शिंदे गटातील औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी दांडी मारल्याने शिरसाट आणि कृषी मंत्री सत्तार यांच्यात धुसफूस सुरू असल्याची चर्चा सुरू झाली.
शेतकऱ्यांबद्दल ज्यांना आस्था आहे ते सर्व आमदार कार्यक्रमाला उपस्थित होते असे विधान सत्तार यांनी केले.यामुळे मंत्रीपद न मिळालेला स्वपक्षातील नेता आपल्याविरोधात कट करीत असल्याचे सत्तार यांच्या विधानाचा रोख आमदार सिरसाट यांच्या दिशेने होता,असे बोलले जात आहे. शिरसाट यांच्यासोबत आपले अथवा त्यांचे आपल्यासोबत कोणतेही मतभेद नसल्याची सारवासारवही त्यांनी केली.
शिवसेनेतील बंडाच्या वेळी औरंगाबाद जिल्ह्यातील पाच आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत होते. यामध्ये अग्रभागी होते ते औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट. आ. संजय शिरसाट यांना मंत्री केले जाईल, याबाबत शेवटच्या क्षणापर्यंत चर्चा होती. मात्र ऐनवेळी यादीतून त्यांचे नाव कापून सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांना मंत्री करण्यात आले. सत्तार यांना मंत्रीपद मिळू नये, यासाठी नेमके त्याच वेळी त्यांच्या टीईटी घोटाळ्यातील यादीत त्यांच्या मुलांची नावे असल्याचे प्रकरण समोर आले होते. नुकत्याच पार पडलेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान गायरान जमीन वाटप कथित घोटाळा, तसेच सिल्लोड येथील कृषी महोत्सवासाठी पावती पुस्तक छापल्याचे प्रकरण समोर आणून सत्तार यांचा राजीनामा घेण्याची मागणी विरोधी पक्षाने केली होती. यापार्श्वभूमीवर शनिवारी त्यांनी एका न्यूज चॅनलला मुलाखत देताना मंत्रीपद मिळाले नाही,असा स्वपक्षातील नेता माझ्याविरोधात कट करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्यांच्या या आरोपानंतर शिंदेगटातील आमदारांमध्ये मंत्रीपदावरून धुसफूस सुरू असल्याची चर्चेला सुरवात झाली. यादरम्यान सत्तार यांनी आयोजित कृषी महोत्सावचे उदघाटन रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती सिल्लोड येथे झाले. या उदघाटनासाठी आमदार संजय शिरसाट यांनी दांडी मारली. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थिती झालेल्या या कार्यक्रमासाठी शिंदे गटातील आ. शिरसाट वगळता अन्य सर्व आमदार हजर होते. विषयी बोलताना सत्तार यांनी ज्यांना शेतकऱ्यांबद्दल प्रेम होते ते सर्व आमदार आले असे खोचक विधान केले. यावरून सत्तार यांचा कालचा बोलण्याचा रोख शिरससाट यांच्या दिशेने होता, असे बोलले जात आहे. शिरसाट यांना दुसरे महत्वाचे काम असेल यामुळे ते आले नसावे,असे नमूद करीत आपले शिरसाट यांचे आपल्याबद्दल आणि माझे त्यांच्या बद्दल कोणतेही मतभेद नसल्याची सारवासारव कृषीमंत्र्यांनी केली.