आमदार, मंत्री विमान प्रवास करतात, मग छत्रपती संभाजीनगरच्या विमानसेवेकडे लक्ष का देत नाही?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 04:59 PM2024-11-06T16:59:23+5:302024-11-06T17:00:49+5:30
दळणवळण सुविधेचा जाहीरनामा: बससेवा, रेल्वे, विमानसेवा वाढली तरच जिल्ह्याचा विकासही ‘फास्ट ट्रॅक’वर
छत्रपती संभाजीनगर : आमदार, मंत्री झाल्यानंतर मुंबई, दिल्लीला ये-जा करण्यासाठी विमानसेवेचा वापर केला जातो; परंतु छत्रपती संभाजीनगरातील विमानसेवा वाढीसाठी आमदार, मंत्री लक्ष का देत नाहीत, असा प्रश्न सर्वसामान्यांतून उपस्थित केला जात आहे. बससेवा, रेल्वे, विमानसेवा या सुविधा चांगल्या असतील तर जिल्ह्याचा विकासही ‘फास्ट ट्रॅक’वर येतो. त्यामुळे भावी आमदार आणि नव्या सरकारने याकडे अधिक लक्ष देण्याची मागणी होत आहे.
मोजक्या शहरांपुरती हवाई कनेक्टिव्हिटी, रेल्वे कनेक्टिव्ही, जीर्ण बसस्थानक अशी अवस्था आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात. कारण जिल्ह्यातील दळणवळण म्हणजे विमानसेवेसह वाहतूक क्षेत्रासाठी अनेक नव्या घोषणा करण्यात आल्या. मात्र, यातील काही गोष्टी झाल्या, तर काही अर्धवट राहिल्या, तर काही कागदावरच. त्यामुळे वाहतूक क्षेत्राच्या विकासाला काहीशी खीळ बसली आहे.
विमानसेवेतील प्रश्न...
- विमानतळाच्या धावपट्टी विस्तारासाठी प्रलंबित असलेले भूसंपादन आणि प्रत्यक्ष विस्तारीकरण लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे.
- शहराचा ‘उडान’ योजनेमध्ये समावेश होणे आवश्यक.
- विमानाच्या इंधनावरील व्हॅट एक टक्का केल्यास विमानसेवा वाढीस मदत होईल.
- छत्रपती संभाजीनगर-अहमदाबाद-जयपूर आणि उदयपूर-छत्रपती संभाजीनगर विमानसेवा सुरू करणे.
- आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी चिकलठाणा विमानतळावर इमिग्रेशन चेक पोस्टला लवकरात लवकर मान्यता मिळावी.
- एअर बेस, विमानांसह हेलिकाॅप्टर सेवा.
- देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय कार्गो सेवा.
- औद्योगिक, पर्यटन शहरे, बुद्धिस्ट सर्किटला हवाई ‘कनेक्टिव्हिटी’
रेल्वे प्रश्न...
- अंकई (मनमाड) ते छत्रपती संभाजीनगर या ९८ कि.मी. मार्गाचे दुहेरीकरण गतीने पूर्ण करण्याची गरज.
- छत्रपती संभाजीनगर-परभणी दुहेरीकरणासाठी प्रयत्नांची गरज.
- रोटेगाव-पुणतांबा हा २७ कि.मी.चा प्रस्तावित मार्ग कागदावरच.
- छत्रपती संभाजीनगर-दौलताबाद-कन्नड-चाळीसगाव हा लोहमार्ग मार्गी लागणे.
- औद्योगिक दृष्टीने आवश्यक असलेल्या छत्रपती संभाजीनगर-अहमदनगर या नवीन मार्गासाठी प्राधान्याने लक्ष घालून या मार्गाचे काम सुरू करावे.
- छत्रपती संभाजीगरच्या पीटलाइनचा २४ बोगींसाठी विस्तार व दक्षिणेकडील मालधक्का हलवून त्याजागी नवीन प्लॅटफॉर्म करणे गरजेचे.
- छत्रपती संभाजीनगरहून देशाच्या महत्त्वाच्या शहरांसाठी थेट रेल्वे सुरू करणे गरजेचे.
नव्या सरकारमध्ये तरी बसपोर्ट, अद्ययावत बसस्थानक मिळेल?
पर्यटन राजधानी असलेल्या सिडको बसस्थानकाच्या जागी उभारण्यात येणाऱ्या बसपोर्ट आणि मध्यवर्ती बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचे २८ ऑगस्ट २०१९ रोजी भूमिपूजन झाले; परंतु अद्यापही कामाला मुहूर्त मिळालेला नाही. नव्या सरकारमध्ये तरी बसपोर्ट, अद्ययावत बसस्थानक होईल का, असा प्रश्न प्रवाशांना पडत आहे.
इंधनावरील व्हॅट कमी व्हावे
एटीएफ म्हणजे एव्हिएशन टर्बाइन इंधनावरील व्हॅटचा दर ५ टक्क्यांवरून १ टक्क्यांपर्यंत कमी करणे आवश्यक आहे. जेणेकरून स्वस्त इंधन हे विमान कंपन्यांना छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून अधिक विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देईल. विमानतळाचा भारत सरकारच्या उडान योजनेतही समावेश करणे आवश्यक आहे. त्यातून विमान कंपन्यांना नव्या विमानसेवा सुरू करणे सोयीचे होईल.
- सुनीत कोठारी, अध्यक्ष, सिव्हिल एव्हिएशन कमिटी, ‘एटीडीएफ’
शहराची व्हावी मार्केटिंग
विमानसेवा वाढली पाहिजे. आहे त्या विमानसेवा कायम राहिल्या पाहिजे. इमिग्रेशन काउंटर सुरू करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ लवकरात लवकर दिले पाहिजे. शहराचे अधिकाधिक चांगल्या प्रकारे मार्केटिंग केले पाहिजे. त्यातून नव्या विमानसेवा वाढीस मदत होईल.
- शिवाजी पाटील, अध्यक्ष, औरंगाबाद डिस्ट्रिक्ट हाॅटेल रेस्टाॅरंट ओनर्स असोसिएशन
आंतरराष्ट्रीय कार्गो सेवा सुरू करावी
ब्यूरो ऑफ इमिग्रेशन, केंद्रीय गृहमंत्रालय येथे पाठपुरावा करून विमानतळाला इमिग्रेशन चेकपोस्ट (आयसीपी) दर्जा देणे आवश्यक आहे. ज्याच्यामुळे थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा लवकर सुरू होईल. अहमदाबाद विमानसेवा कायम ठेवणे, बंगळुरू विमानसेवा दररोज करण्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे. उडान, कृषी उडान योजनेत विमानतळाचा समावेश करणे, थेट आंतरराष्ट्रीय कार्गोसेवा सुरू करणे आवश्यक आहे.
- अक्षय चाबुकस्वार, एअर कनेक्टिव्हिटी एव्हिएशन ग्रुप
नाईट पार्किंगची सुविधा द्यावी
आपल्या विमानतळाची धावपट्टी मोठी करण्यासाठी निधी मंजूर झाला आहे. हे काम वेगाने पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावे. पुढील दोन वर्षे विमान कंपन्यांना मोफत नाइट पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे.
- मुकुंद कुलकर्णी, अध्यक्ष, छत्रपती संभाजीनगर फर्स्ट