संतांचा प्रतिनिधी म्हणून आमदार विधानसभेत हवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:04 AM2021-09-26T04:04:41+5:302021-09-26T04:04:41+5:30
औरंगाबाद : आपल्याला संतांची मोठी परंपरा आहे. आजच्या काळातील समस्यांवरील उत्तरे संत वाङ्मयात सापडतील. त्याचे प्रतिबिंब राजकारणात उमटायचे असेल, ...
औरंगाबाद : आपल्याला संतांची मोठी परंपरा आहे. आजच्या काळातील समस्यांवरील उत्तरे संत वाङ्मयात सापडतील. त्याचे प्रतिबिंब राजकारणात उमटायचे असेल, तर संतांचा प्रतिनिधी आमदार म्हणून विधानसभेत पाठवा, असे आवाहन संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक सु. ग. चव्हाण यांनी केले.
४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनात ‘आजच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर संत साहित्य हेच उत्तर’, या विषयावर सायंकाळी प्र. ई. सोनकांबळे व्यासपीठावर परिसंवाद झाला. नांदेड येथील सु. ग. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिसंवादात बीड येथील दीपा क्षीरसागर, जालना येथील राम रौनेकर, देगलूर येथील रवींद्र बेंबरे, नांदेड येथील संजय जगताप आणि लातूर येथील मोहिब कादरी यांनी आपापले विचार व्यक्त केले.
कुठल्याही धार्मिक प्रार्थना व इतर उपचारांपेक्षा तुटलेली मने जोडणे हीच ईश्वराची सर्वात श्रेष्ठ प्रार्थना आहे, असा संदेश प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी दिला आहे, असे मत मोहिब कादरी यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी प्रेषितांच्या, संतांच्या आणि ख्रिश्चन धर्मातील प्रार्थनांचा उल्लेख केला.
महात्मा चक्रधर यांनी अहिंसेच्या तत्त्वा चा पुरस्कार केला. जीवाच्या कल्याणासाठी, पर्यावरणपूरक असे त्यांचे विचार होते. स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता ही तत्त्वे सर्वज्ञांनी लोकांमध्ये रुजवली, असे प्रतिपादन संजय जगताप यांनी केले.
जगातली सर्वात पहिली लोकशाही यंत्रणा महात्मा बसवेश्वरांनी ‘अनुभव मंटपाच्या’ माध्यमातून प्रत्यक्षात आणली होती. संत तुकाराम, संत रामदास यांच्या अभंग-ओव्यांचा संदर्भ देत त्यांनी संतांनी शिकवलेली मूल्ये आजच्या लोकशाहीत कशी उपयोगात आणावीत, याविषयी रवींद्र बेंबरे यांनी आपले विचार मांडले. समाज मूल्याधिष्ठित झाला, की राजकारण आपोआप शुद्ध होते, असेही ते म्हणाले.
आज पक्षीय नेत्यांमध्ये बलात्कारी प्रवृत्ती वाढली आहे. समाज संतांच्या विचारापासून दूर गेला आणि राजकारणानेही आपसूकच सर्व चांगल्या गुणांना तिलांजली दिल्याचे चित्र दिसत आहे, असे मत दीपा क्षीरसागर यांनी व्यक्त केले. या सत्राचे सूत्रसंचालन कैलास इंगळे यांनी केले, तर आभार सुभाष बागल यांनी केले.
चौकट,
मनातील विकार दूर करा
कुठल्याही धर्मातल्या, कुठल्याही पंथातल्या संतांनी हेच सांगितले आहे, की मनातील विकार दूर झाल्याशिवाय सुधारणा होत नाही. आजही चांगले वर्तन असलेल्या व्यक्तीच्या मागे लोक उभे राहतात, असे राम रौनेकर म्हणाले.