अंबादास दानवे माझे शिष्य, डावलले असते तर इथपर्यंत आले नसते: चंद्रकांत खैरे
By बापू सोळुंके | Published: March 16, 2024 07:01 PM2024-03-16T19:01:26+5:302024-03-16T19:01:31+5:30
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे सतत आपल्याला डावलत असतात, असा आरोप आ. दानवे यांनी केला होता.
छत्रपती संभाजीनगर: विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते हे मोठे पद अंबादास दानवे यांच्याकडे आहे. आपण त्यांना डावलले असते तर ते इथपर्यंत आले नसते, अशा शब्दात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दानवे यांनी त्यांना डावललं जात असल्याच्या आरोपाला उत्तर दिले.
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे सतत आपल्याला डावलत असतात, असा आरोप आ. दानवे यांनी केला होता. शिवाय त्यांनी छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद)लोकसभा मतदार संघातून पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे.यापार्श्वभूमीवर माजी खा. खैरे यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, अंबादास दानवे यांचा मी गुरू आहे. काल मी आणि अंबादास मातोश्रीवर होतो. तेथेही त्यांनी र तुम्ही माझे गुरू आहात,असे म्हणाला होता. तुम्ही एकांगी निर्णय घेता, त्यांना डावलत असता, असा आरोप दानवेंनी तुमच्यावर केला. याकडे लक्ष वेधले असता खैरे म्हणाले की, मी कधी एकांगी निर्णय घेत नाही. शिवसेनेच्या स्थापने पासून मी आहे. त्यामुळे नेता म्हणून मला काही अधिकार आहे. असे असूनही मी सर्वांशी विचारविनिमय करूनच निर्णय घेतो.
खासदार म्हणून २० वर्ष काम केले. पाच वर्ष कुठलही पद नसताना मी काम करीत आहे. लोकांना वाटते मीच खासदार व्हावे. अंबादास दानवे शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे वृत्त आहे, याविषयी विचारले असता ते म्हणाले की, अंबादास कडवट शिवसैनिक आहे, अंबादास शिंदे सेनेत जाणार नाही,असे आपल्याला वाटत असल्याचे खैरे म्हणाले. पक्षाने तुमच्याऐवजी आ. दानवे यांना तिकिट दिले तर तुम्ही त्यांचा प्रचार करणार का, या प्रश्नाचे उत्तर देताना खैरे म्हणाले की, मला पक्षाचा आदेश मान्य असेल आणि एक शिवसैनिक म्हणून मी काम करीन.
परंतु जनतेला मला कोणत्याही परिस्थिती तुम्ही खासदार व्हा, असे म्हणत आहे. शहरात दोन खासदार असताना काम करत नाही. तुम्हाला शिंदे सेनेकडून तिकीट मिळालं तुम्ही तिकडे जाणार का, असे विचारले असता, खैरे म्हणाले मी कुठेच जाणार नाही.मला अनेक लोकांचे फोन आले, मात्र मी पक्ष सोडला नाही. वेगवेगळ्या पक्षातील लोक फोन करून म्हणतात कशाला तिकडे (शिवसेनेत) थांबता. मात्र मी एक कडवट शिवसैनिक आहे, हे त्यांनाही माहिती आहे. यामुळे जास्त आग्रह धरत नाही.