वाहतुकीला शिस्त लावण्यात मनपाचे असहकार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 01:28 AM2017-12-03T01:28:05+5:302017-12-03T01:28:08+5:30
शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याची जेवढी जबाबदारी वाहतूक पोलिसांची आहे, तेवढेच दायित्व महापालिकेचे आहे. महापालिका मागील अनेक वर्षांपासून वाहतूक पोलिसांना मूलभूत सोयी-सुविधाच प्रदान करीत नाही, त्यामुळे या कामात अनेक अडचणी निर्माण होत असल्याचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी शनिवारी महापौरांना सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याची जेवढी जबाबदारी वाहतूक पोलिसांची आहे, तेवढेच दायित्व महापालिकेचे आहे. महापालिका मागील अनेक वर्षांपासून वाहतूक पोलिसांना मूलभूत सोयी-सुविधाच प्रदान करीत नाही, त्यामुळे या कामात अनेक अडचणी निर्माण होत असल्याचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी शनिवारी महापौरांना सांगितले.
महापौर नंदकुमार घोडेले यांनी पोलीस आयुक्तांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी बेशिस्त वाहतुकीवर चर्चा करण्यात आली. शहरातील मुख्य रस्त्यांवर झेब्रा क्रॉसिंग नाहीत. ठिकठिकाणी दुभाजक नाहीत. अत्याधुनिक गतिरोधक नाहीत. सिग्नल कधीही सुरू होतात, कधीही बंद होतात. अनेक सिग्नलच्या टायमिंग घड्याळ खराब झाल्या आहेत. पोलिसांनी यापूर्वी अनेकदा मनपाकडे पाठपुरावा केला; मात्र त्यासाठी अजिबात प्रतिसाद मिळत नाही. लवकरच वाहतूक पोलीस आणि मनपा अधिकाºयांची एक संयुक्त बैठक घेऊन वाहतुकीशी संबंधित विविध प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. ८० लाख रुपये खर्च करून शहरातील मुख्य रस्त्यांवर झेब्रा क्रॉसिंग, कॅट आईज आदी मूलभूत सोयी-सुविधा प्रदान करण्यासाठी प्रशासनाने अंदाजपत्रक तयार केले. या फाईलला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. प्रशासनाकडून या कामासाठी चालढकल करण्यात येत आहे.
शहरातील अनेक संघटना, संस्था महापालिकेच्या विकासकामात सहभागी होण्यास तयार आहेत. शहराच्या सौंदर्यीकरणात आपलाही खारीचा वाटा असावा, अशी त्यांची इच्छा आहे. मनपाकडे एकदा त्यांचा प्रस्ताव आल्यावर त्याचा पाठपुरावा होत नाही. त्यासाठी मनपा स्वतंत्र सेल तयार करणार असल्याचे महापौरांनी नमूद केले.