टिकून राहण्याचे मनसेपुढे आव्हान?
By Admin | Published: November 25, 2014 12:53 AM2014-11-25T00:53:00+5:302014-11-25T01:01:11+5:30
औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मंगळवारपासून तीन दिवस शहरात मुक्कामी येत असून विधानसभा निवडणुकीत
औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मंगळवारपासून तीन दिवस शहरात मुक्कामी येत असून विधानसभा निवडणुकीत पक्षाची निष्प्रभ कामगिरी झाल्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या माध्यमातून टिकून राहण्याचे मोठे आव्हान पक्षापुढे आहे.
महापलिकेच्या एप्रिल २०१५ मध्ये होणाऱ्या निवडणुकीची तयारी करण्याच्या हेतूने राज ठाकरे यांचा दौरा होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा झाली होती. तिला प्रतिसादही चांगला मिळाला होता. मात्र, त्याचे रूपांतर मतांमध्ये झाले नाही. जिल्ह्यात सर्व नऊ मतदारसंघांत मनसेने उमेदवार उभे केले आणि त्या सर्वांची अनामत रक्कम जप्त झाली. त्यामुळे कार्यकर्तेही सैरभैर आहेत. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतरही मनसेचे अनेक कार्यकर्ते मात्र पक्षातच टिकून आहेत. कदाचित महापालिका निवडणुकीच्या तोंडावर गळती लागू शकते त्या दृष्टीनेही राज ठाकरे यांचा दौरा पक्षासाठी महत्त्वाचा आहे.
महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पक्ष तयारी करणार असला, तरी शहरात असलेल्या तीन विधानसभा मतदारसंघांत पक्षाची कामगिरी अगदीच सामान्य राहिली आहे. औरंगाबाद मध्य मतदारसंघात नगरसेवक असलेले राजवैभव वानखेडे यांना सुमारे पाच हजारांवर इतकी मते मिळाली.
पूर्व मतदारसंघातील उमेदवार आणि शहराध्यक्ष सुमित खांबेकर यांना तसेच पश्चिम या राखीव मतदारसंघात गौतम आमराव यांना दोन हजारांच्या आत मते मिळाली. खरे तर या तिन्ही मतदारसंघांत मनसेचे उमेदवार तुल्यबळ नव्हते, तरीही मनसेने एक परीक्षा देण्याचा प्रयत्न केला, असे दिसते. २०१० च्या महापालिका निवडणुकीत एकच नगरसेवक निवडून आला. त्यानंतर मागील पाच वर्षांच्या काळात कार्यकर्त्यांनी विविध आंदोलने छेडून पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवले. महापालिकेच्या विरोधात तर पक्षाने रान उठविल्याचे चित्र दिसले. शैक्षणिक क्षेत्रात तसेच महिलांची अनेक आंदोलने झाली. मात्र, शिवसेना, काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी यांच्या गदारोळात ती विरून गेली. विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसत नाही. राज ठाकरे नव्याने चैतन्य निर्माण करतील, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना आहे. महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने राज ठाकरे कोणता नवा मंत्र देतात, याबाबत कार्यकर्त्यांमध्येही उत्सुकता आहे.