"मनसेमध्ये मंदिरं उघडण्याची हिंमत नाही, त्यांचं आंदोलन हा तर भाजपाचा स्पॉन्सर कार्यक्रम’’ शिवसेनेची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 01:48 PM2021-09-06T13:48:43+5:302021-09-06T13:50:02+5:30
MNS Vs Shiv sena : मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार शाब्दिक लढाई सुरू आहे.
औरंगाबाद - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून भाविकांसाठी बंद झालेले मंदिरांचे द्वार उद्याप उघडण्यात आलेले नाहीत. मंदिरे उघडण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संयमी भूमिका घेतली आहे. मात्र या मुद्द्यावरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार शाब्दिक लढाई सुरू आहे. दरम्यान, राज्यातील मंदिरे भाविकांसाठी उघडण्यात यावीत, या मागणीसाठी मनसेने तीव्र आंदोलन सुरू केले आहे. आज औरंगाबादमध्येहीमनसेकडून मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन करण्यात आले. मात्र औरंगाबादमधील शिवसेनेच्या नेत्यांनी या आंदोलनावर बोचऱ्या शब्दात टीका केली आहे.
शिवसेनेचे औरंगाबादमधील ज्येष्ठ नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि आमदार अंबादास दानवे यांनी मनसेच्या या आंदोलनाची खिल्ली उडवली आहे. मनसेमध्ये मंदिरं उघडण्याची हिंमत नाही. मनसेकडून मंदिर उघडण्यासाठी सुरू असलेलं आंदोलन म्हणजे भाजपाचा स्पॉन्सर कार्यक्रम आहे, त्यांनी आमच्या नादी लागू नये, अशी टीका चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांनी केली.
दरम्यान, मंदिरे उघडण्यात यावीत, या मागणीसाठी मनसेने आज औरंगाबादमध्ये तीव्र आंदोलन केले. औरंगाबादमधील गुलमंडी परिसरात असलेल्या सुपारी हनुमान मंदिरासमोर मनसेकडून हे आंदोलन करण्यात आले.