छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनात मनसे मैदानात; शहरात स्वप्नपूर्ती रॅलीचे आयोजन
By बापू सोळुंके | Published: March 14, 2023 03:20 PM2023-03-14T15:20:58+5:302023-03-14T15:21:44+5:30
हजारो नागरीक समर्थनपत्रे घेऊन पोहचणार विभागीय आयुक्तालयात
छत्रपती संभाजीनगर: शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर व्हावे, अशी अनेक वर्षापासूनची येथील नागरीकांची मागणी आणि स्वप्न होते. केंद्र सरकारने औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतल्याने लाखो नागरीकांची स्वप्नपूर्ती झाली आहे. हा आनंद साजरा करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने १६ मार्च रोजी स्वप्नपूर्ती रॅलीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मनसचे संपर्कनेते दिलीप धोत्रे , जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. रॅलीत सहभागी होणारे हजारो नागरीक छत्रपती संभाजीनगरचे समर्थनपत्र विभागीय आयुक्तांना देणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
धोत्रे म्हणाले की, नामांतर छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर काही लोकांनी याविरोधात आंदोलन सुरू केले. काेणतेही कारण नसताना खासदार इम्तियाज जलील आणि अन्य काही लोकांनी छत्रपती संभाजीनगर नावास विरोध केला जात आहे. या शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर व्हावे, असे येथील नागरीकांचे अनेक दशकापासून चे स्वप्न आता पूर्ण झाले आहे. या नागरीकांना सोबत घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वप्नपूर्ती रॅली आयोजित केली आहे. १६ मार्च रोजी सकाळी साडेअकरा वाजता राजाबाजार येथील संस्थान गणपती येथून रॅलीला सुरवात होईल.
यानंतर ही रॅली हजारोंच्या संख्येने विभागीय आयुक्तालयात जाईल. रॅलीत सहभागी नागरीक छत्रपती संभाजीनगरचे समर्थनपत्र हातात घेऊन सहभागी होतील. ही सर्व समर्थनपत्र विभागीय आयुक्तांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्वप्नपूर्ती रॅलीत जास्तीत जास्त नागरीकांनी सहभागी व्हावे, आणि समर्थनपत्रे मनसेकडे जमा करावी, असे आवाहन मनसेतर्फे करण्यात आले. वैभव मिटकर,बीपिन नाईक,गजन गौडा पाटील,अनिकेत निल्ल्लावार,प्रशांत जोशी,संकेत शेटे,नागेश तूसे,अशोक पवार,राहुल पाटील,विक्रम सिंग परदेसी,मनीष जोगदंड इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. या पत्रकार परिषदेला मनसेचे सरचटीस संतोष नागरगोजे,अशोक तावरे, सतनामसिंग गुलाटी, दिलीप बनकर पाटील आदींची उपस्थिती होती.