मनसेने शिवजयंतीची ‘तिथी’ अखेर साधलीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 07:40 PM2020-03-13T19:40:39+5:302020-03-13T19:45:22+5:30
सर्व ताकदीच्या व्याख्येत तिथीनुसार शिवजयंती करण्याची संधी मनसेने साधली.
- विकास राऊत
औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची औरंगाबाद काय ताकद आहे, असा प्रश्न विचारला किंवा पडला तर उत्तर एकच येईल, काहीही नाही. जिल्ह्यातील ग्रामपंचायतीपासून पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि महापालिकेत पक्षाची काहीही ताकद सध्या नाही. येथून मागे होती, नव्हती तो भाग वेगळा; परंतु सध्या तरी पक्षाकडे पक्षप्रमुख, नेते, पदाधिकाऱ्यांविना काहीही नाही. अशा सर्व ताकदीच्या व्याख्येत तिथीनुसार शिवजयंती करण्याची संधी मनसेने साधली.
जिल्ह्यात शिवसेनेचे सात आमदार, जिल्हा परिषद आणि महापालिकेतील सदस्यांसह पंचायत समिती, ग्रामपंचायतींमधील सत्ताकारणाचा टक्का पाहता तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याचे शक्तिप्रदर्शन करण्यात शिवसेना फिकी पडल्याचे जाणवले. तारीख आणि तिथी हा शिवजयंतीचा मुद्दा शिवसेनेनेच आजवर चालू ठेवला आहे. त्यामुळे त्यांनी सत्ताधीश म्हणून गुरुवारी जल्लोषाचा धुराळा उडविण्याची शिवसैनिकांना अपेक्षा होती. मात्र, ती अपेक्षा कुठेतरी ‘कोरोना’च्या आड दडल्याचे दिसले. गर्दी जमा होणार नाही, शक्तिप्रदर्शन होणार नाही. पोलीस परवानगी मिळणार नाही, अशा काही बाबींवर बुधवारी शिवसेनेच्या नेत्यांनी खाजगीत चर्चा केली. पक्षादेशही पाळायचा आणि मनपा निवडणुकीच्या तोंडावर विशिष्ट समाजाचे मनही दुखवणार नाही, याची काळजी घेत शिवसेनेने कोरोना व्हायरसमुळे मिरवणुकीचा कार्यक्रम रद्द करण्याचे ठरविले. त्यातच काही आमदार मुंबईला निघून गेले. या सगळ्या कारणांमुळे वॉर्डनिहाय शिवपूजन आटोपून शिवसैनिकांनी जयंती साजरी करण्याच्या सूचना करण्यात आल्या. क्रांतीचौकात मनसे आणि शिवसेना यांचे व्यासपीठ आमने-सामने लागले. दोन्ही व्यासपीठांकडे येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या नजरा वळत होत्या. कुणाकडे किती जमलेत, हे नागरिकांच्या नजरेतून सुटले नाही. एरव्ही पोलीस परवानगीकडे लक्ष न देता कार्यक्रम करण्याची तयारी असणाऱ्या शिवसेनेने मात्र या तिथीला मागे पाऊल घेतल्याचे सर्वांच्या लक्षात आले.
क्रांतीचौकावर मनसेचा ताबा
मुंबईतून येऊन मनसेप्रमुख राज ठाकरे व त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी तिथीनुसार शिवजयंतीनिमित्त क्रांतीचौकात शक्तिप्रदर्शनाचा प्रयत्न केला. आज ठाकरे यांच्याकडे जिल्ह्यातील (मोडक्या-तोडक्या) संघटनेपलीकडे काहीही नाही. असे असताना त्यांनी क्रांतीचौकावर ताबा घेतला. पूर्ण परिसरात राजमुद्रित ध्वजांची झालर होती, त्यामुळे शिवसेना झाकोळल्याचे दिसून आले. ग्रामीण भागातील सोडले तरी महापालिकेत शिवसेनेचे ३० च्या आसपास नगरसेवक आहेत, किमान त्यांनी तरी क्रांतीचौकात गर्दी करणे अपेक्षित होते; परंतु वॉर्डनिहाय शिवपूजनाच्या निमित्ताने तेदेखील क्रांतीचौकाकडे फिरकले नाहीत. मनसेची राजकीय ताकद पाहता त्यांना गर्दी जमविता आली, असे म्हणण्यापेक्षा त्यांनी शिवजयंतीची ‘तिथी’ साधली, असेच म्हणावे लागेल.