'पोलिसांनी औरंगाबादमधील राज ठाकरेंच्या सभेला परवानगी दिली नाही तर..'; मनसेचं आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 06:06 PM2022-04-20T18:06:51+5:302022-04-20T18:13:13+5:30
औरंगाबादमध्ये १ मे रोजी होणाऱ्या सभेसाठी मनसेने जोरदार तयारी सुरु केली आहे.
औरंगाबाद- औरंगाबादमध्ये १ मे रोजी होणाऱ्या सभेसाठी मनसेने जोरदार तयारी सुरु केली आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीसह पाच संघटनांनी मनसेप्रमुखराज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेला विरोध केला आहे. राज ठाकरेंच्या या सभेला परवानगी नाकारण्यात यावी, असं पत्र या पाच संघटनांनी पोलीस आयुक्तांना पाठवलं आहे. मात्र यानंतरही राज ठाकरेंची सभा होणारच असं विधान, मनसेचे औरंगाबादचे शहराध्यक्ष सुमित खांबेकर यांनी केलं आहे.
जय महाराष्ट्र! #RajThackeray#महाराष्ट्र_दिन#MNSAdhikrutpic.twitter.com/nD2KUw5Y4A
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) April 17, 2022
आज बुधवार २० एप्रिल रोजी औरंगाबाद शहरातील सुभेदारी विश्राम गृह इथे मनसेची बैठक संपन्न झाली. या बैठकीनंतर सुमित खांबेकर म्हणाले की, कोणी कितीही विरोध असला तरी राज ठाकरे यांची औरंगाबादला सभा शंभर टक्के होणार आणि तीही पूर्ण ताकदीने होणार आहे. तसेच पोलिसांनी राज ठाकरेंच्या सभेला परवानगी दिली नाही, तरीदेखील सभा ही होणारच आणि ठरलेल्या ठिकाणी, असा इशारा देखील सुमित खांबेकर यांनी दिला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन राज ठाकरेंच्या सभेला परवानी देणार की नाही, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आम्ही प्रशासनाच्या विविध परवानग्या घेतल्या आहेत. तसेच आता पोलीस प्रशासनाच्या परवानगीसाठी अर्ज केला आहे. पोलीसही लवकरच सभेसाठी परवानगी देणार असल्याची माहिती सुमित खांबेकर यांनी यावेळी दिली. राज ठाकरे यांच्या आदेशाने औरंगाबाद शहरातील विविध भागात महाआरतीचेही आयोजन करण्यात आले, असून आम्ही लवकरच औरंगाबाद शहरातील विविध भागामध्ये जाऊन महाआरती घेणार आहे. तसेच राज ठाकरेंच्या १ मे रोजी होणाऱ्या सभेला विविध हिंदुत्ववादी संघटनेने पाठिंबा दिला असल्याची माहितीही सुमित खांबेकर यांनी दिली.
औरंगाबाद पोलीस आयुक्त निर्णय घेतील- गृहमंत्री वळसे पाटील
राज ठाकरे हे १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा घेणार आहेत. त्यांनी यासंदर्भात घोषणाही केली होती. परंतु त्यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीसह काही जणांकडून करण्यात आली. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, अशा प्रकारची कोणतीही निवेदनं गृहखात्याकडे आलेलं नाही. ती औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांकडे आली आहे. ते परिस्थिती पाहूनच निर्णय घेतील, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं.