मनसेचा महावितरणला दणका; मुख्य अभियंत्यावर भिरकावली वीज बिले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 05:03 PM2020-11-24T17:03:51+5:302020-11-24T17:05:31+5:30
मुख्य अभियंता भुजंग खंदारे यांच्यावर बिले फाडून फेकत संताप व्यक्त केला
औरंगाबाद: महावितरणने लॉकडाऊनमध्ये अनेकांना वाढीव वीजबिले दिली आहेत. त्या बिलाबाबत कंपनी काही निर्णय घेत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवारी मुख्य अभियंता भुजंग खंदारे यांच्यावर बिले फाडून फेकत संताप व्यक्त केला.
राज्य सरकार विजबिलावर कोणताही निर्णय घ्यायला तयार नाही. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यपालांना या संदर्भातील निवेदन दिले. परंतु तरीही सरकार या बाबत जनतेला दिलासा मिळावा असा कोणताही निर्णय घ्यायला तयार नाही. जनता वाढीव वीजबिल आल्याने त्रस्त झाली आहे.
राज ठाकरे यांनी या संदर्भात राज्य सरकारला सोमवारपर्यंत अल्टिमेटम दिला होता, परंतु सरकारने आजही कोणताही निर्णय यावर घेतला नसल्याने मनसेने आक्रमक होत मुख्य अभियंता भुजंग खंदारे यांच्याकडे जाब विचाराला. जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी जनतेला आलेली वीजबिले अभियंता समोर फाडत त्यांच्या दिशेने भिरकावली. शहर अध्यक्ष सतनाम सिंग गुलाटी, राजू खरे, नामदेव बेंद्रे, संदीप कुलकर्णी यांच्यासह अनेक जण यावेळी उपस्थित होते.
२६ रोजी धडक मोर्चा
मनसे जिल्हाधिकारी कार्यालयावर २६ नोव्हेंबर रोजी धडक मोर्चा काढणार आहे. या मोर्चात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाअध्यक्ष दाशरथे व शहरअध्यक्ष गुलाटी यांनी केले आहे.