राज ठाकरेंच्या सभेला घातलेल्या अटींचं पालन करणार?; बाळा नांदगावकरांनी स्पष्टच सांगितलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 11:22 PM2022-04-28T23:22:50+5:302022-04-28T23:38:29+5:30
मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या १ मेच्या सभेला परवानगी दिल्याने मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आभार मानले आहे.
औरंगाबाद- मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या १ मे रोजी होणाऱ्या औरंगाबादमधील सभेला अखेर परवानगी मिळाली आहे. आज सायंकाळी पोलिसांनी एकूण १६ अटी घालत राज ठाकरेंच्या परवानगी दिल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये जातीय तेढ आणि धार्मिक भावना भडकवणारे वक्तव्य करू नये, असं देखील पोलिसांनी म्हटलं आहे.
पोलिसांनी घातलेल्या अटीमध्ये सदर सभा ०१/०५/२०२२ रोजी १६.३० ते २१.४५ या वेळेतच आयोजीत करावी. तसेच कार्यक्रमाचे ठिकाण आणि वेळेत कोणत्याही प्रकारचा बदल करु नये, असं सांगण्यात आलं आहे. तसेच सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी स्वंयशिस्त पाळावी. सभेला येताना व परत जाताना कोणीही आक्षेपार्ह घोषणाबाजी, हुल्लडबाजी, असभ्य वर्तन करु नये, असं म्हटलं आहे. कार्यक्रमा दरम्यान कोणतेही शस्त्र, तलवारी, स्फोटक पदार्थ बाळगु नये, अगर प्रदर्शन करु नये व शस्त्र अधिनियमातील तरतुदीचा भंग करु नये, अशी तंबीही पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी अटी घातल्यानंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाची भूमिका मांडली. सभेला परवानगी दिल्याबद्दल सरकार आणि पोलिसांचे आभार असल्याचं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं. पोलिसांनी घातलेल्या अटींचं पालन केलं जाईल, असं स्पष्ट केलं आहे. कायदा-सुव्यवस्था राखणं तुमच्याप्रमाणेच आमचं देखील कर्तव्य आहे, असं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.
बाळा नांदगावकर म्हणाले की, पोलिसांनी त्यांचं काम केलं आहे. आम्ही आमचं काम करणार. त्यापलीकडे काही झालं, तर पोलीस त्यांचं काम करण्यासाठी आहेतच. आम्हाला कोणतीही अट जाचक वाटत नाही. कारण पोलीस जेव्हा केव्हा सभा होतात, त्यासाठी अशाच प्रकारे अटी देतात. कदाचित आमच्या सभेसाठी जास्त अटी असतील. पोलिसांना सतर्क राहाणं गरजेचं असतं. त्या दिवशी प्रचंड कार्यक्रम आहेत. त्यामुळे पोलीस काळजी घेत असतील, असंही बाळा नांदगावकर यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, राज ठाकरेंच्या सभेला थेट अयोध्येतून हिंदुत्ववादी संघटनांचे अडीच हजार कार्यकर्ते राज ठाकरेंच्या सभेसाठी येणार आहे. अयोध्येतील हिंदुत्वावादी संघटनांनी राज ठाकरेंच्या सभेला पाठिंबा दर्शवला आहे. या संघटनांचे जवळपास अडीच हजार कार्यकर्ते औरंगाबादमध्ये राज ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठी येणार असल्याची माहिती पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आली आहे. सभेची पूर्णपणे तयारी आम्ही करणार आहोत. स्टेजचं काम दोन दिवसांत पूर्ण होईल, अशी माहिती मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी दिली आहे.