कुणाचं हिंदुत्व बोगस अन् कुणाचं खरं हे महाराष्ट्राला माहीत आहे- नितिन सरदेसाई
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 12:14 PM2022-04-30T12:14:44+5:302022-04-30T12:15:41+5:30
उद्धव ठाकरेंच्या या विधानावरुन मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी निशाणा साधाल आहे.
औरंगाबाद- मनसे आणि भाजपचं हिंदुत्व किती बोगस आहे हे जनतेला दाखवून द्या, भाजपच्या आरोपांना सडेतोड उत्तर द्या. याबरोबरच भाजपवर तुटून पडा असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्य बैठकीत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.
बाबरी मशीद पडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते? मंदिरासाठी यात्रा सुरु होती तेव्हा राज ठाकरेचं काय सुरु होतं? असे प्रश्न उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केले. याबरोबरच भाजपवर तुटुन पडा, त्यांच्या आरोपांना सडेतोड उत्तर द्या, भाजप आणि मनसे यांचं हिंदुत्व कसं बोगस आहे हे जनतेला दाखवा, आपली कामं लोकापर्यंत पोहोचवा अशा सूचना उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
उद्धव ठाकरेंच्या या विधानावरुन मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी निशाणा साधाल आहे. महाराष्ट्राच्या जनतेला कुणाचं हिंदुत्व बोगस आणि खरं आहे हे माहीत असून हिंदुत्वाचा वसा घेतलेले लोक कसे वागतायत हे महाराष्ट्राला माहीत आहे, असं नितीन सरदेसाईंनी म्हटलं. तसेच औरंगाबाद शिवसेनेचा बालेकिल्ला होता. मात्र आता तो नाहीय, अशी टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, येत्या दोन-तीन दिवसांमध्ये राज्याचं राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. १ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुण्यात जाहीर सभा घेणार आहेत. त्यानंतर लगेच पुढील आठवड्यात उद्धव ठाकरे औरंगाबाद येथे सभा घेणार आहेत.
काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे एका कार्यक्रमात बोलताना विरोधकांचा समाचार घेणार असल्याचं म्हणाले होते. त्यानंतर लगेच आठवड्याभरातच पुणे आणि औरंगाबाद या दोन सभा जाहीर करण्यात आल्या आहेत. महत्वाचं म्हणजे राज ठाकरे १ मे रोजी औरंगाबादमध्ये ज्या मैदानात सभा घेणार आहेत. त्याच मैदानावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.