दाेन दिवसात भोंगे उतरवा; राज ठाकरेंचा अल्टीमेटम, "औरंगाबादेतच नाही, तर मराठवाड्यात सभा घेणार"
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 05:25 AM2022-05-02T05:25:20+5:302022-05-02T05:26:18+5:30
पवारांना ‘हिंदू’ शब्दाची ॲलर्जी, ते सोयीचंच वाचतात; राज ठाकरेंचा पुन्हा निशाणा.
औरंगाबाद : लाऊडस्पीकर हा सामाजिक विषय आहे. शांतता बिघडवण्याची माझी इच्छा नाही. सर्व लाऊडस्पीकर अनधिकृत असून उत्तर प्रदेशातील लाऊडस्पीकर उतरू शकतात, तर महाराष्ट्रातही उतरले पाहिजेत. आज एक तारीख, उद्या दोन, तीन ईद. पण चार मे नंतर ऐकणार नाही, असा इशारा देत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भोंगे उतरविण्यासाठी तीन दिवसांचा अल्टीमेटम येथे दिला.
मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरील विराट सभेत बोलताना राज यांनी औरंगाबादेतच नाही तर मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात, नंतर उत्तर व पश्चिम महाराष्ट्र व पुढे कोकणात अशा सभा घेणार असल्याचे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना टीकेचे लक्ष्य करीत राज्यात जातीय विष कालवू नका, असे आवाहन केले. शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना अनुल्लेखांनी मारत शहरातील आठ दिवसांनी होणाऱ्या पाणीपुरवठ्यावरदेखील बोट ठेवले.
४५ मिनिटांच्या सभेत ठाकरे यांनी इतिहासाचे दाखले देत संदर्भ सादर केले. प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकांतील हवाला देत पवार यांच्यावर टीका करीत त्यांना ‘हिंदू’ या शब्दाची ॲलर्जी असल्याचा घणाघात केला. देवगिरी, पैठण या राजधान्या, खिलजीने केलेले अतिक्रमण, छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना घेऊन निर्माण केलेले साम्राज्य यावर प्रकाश टाकून राज यांनी सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकारणावर टीका केली.
सध्या टिंगलटवाळी सुरू आहे
राज्यात समाजवाद, बुद्धीजम, हिंदुजम, कम्युनिजम विचार होता. सध्या टिंगलटवाळी सुरू आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. देशाला विचारवंत, समाजसुधारक महाराष्ट्राने दिले. मात्र आज राज्याची अवस्था वाईट झालेली आहे. ही परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतर झाली आहे.
शरद पवार सोयीचे वाचतात
मी त्यांना म्हणतो, तुम्हीदेखील त्यांची पुस्तके वाचा. परंतु पवार हे त्यांना जे सोयीचे आहे तेच वाचतात. जेम्स लेन आणि दिवंगत बाबासाहेब पुरंदरे यांचा संबंध दाखवून मराठा समाजाची माथी भडकविण्याचे काम पवारांनी केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना पुरंदरे यांनी घराघरात पोहोचविले, परंतु ते ब्राह्मण असल्याने त्यांचा द्वेष केला, असे राज ठाकरे म्हणाले.
आता गीतरामायण ऐकत आहेत
- आता शरद पवार हे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत आहेत. गीतरामायण ऐकत आहेत, जेव्हा मी त्यांच्यावर टीका केली, तेव्हा त्यांना हे सगळे सुचत आहे.
- मी त्यांना नास्तिक म्हटले त्यानंतर ते सोशल मीडियातून आस्तिकतेचे दाखले देत आहेत.
- परंतु ते नास्तिक असल्याचे खा. सुप्रिया सुळे यांनी लोकसभेतच सांगितले होते. त्यांनी मला माझे आजोबा प्रबोधनकारांची पुस्तके वाचण्याचा सल्ला दिला.