पाण्यासाठी मनसेचे आंदोलन
By Admin | Published: January 31, 2017 12:09 AM2017-01-31T00:09:30+5:302017-01-31T00:11:37+5:30
लातूर : शहरातील प्रभाग क्र. २ मध्ये पिण्याच्या पाण्यासह मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सोमवारी आंदोलन करण्यात आले.
लातूर : शहरातील प्रभाग क्र. २ मध्ये पिण्याच्या पाण्यासह मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सोमवारी महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रभागातील नागरिकांच्या वतीने मनपा आयुक्तांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
लातूर शहरातील प्रभाग क्र. २ मध्ये मळवटी रोड परिसरातील सिद्धेश्वर नगर, अब्दुल कलाम नगर, जयनगर, सनतनगर, बरकत नगर, हरिभाऊ नगर आदी परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या परिसरात पाईपलाईनही करण्यात आली नाही. त्यामुळे कुपनलिका आणि बोअरचा नागरिकांना आधार घ्यावा लागतो. महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या बोअरला मोटार बसविण्यात आली नाही. त्यामुळे बरकतनगर, मळवटी रोड व सनतनगर या भागातील नागरिकांचा पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. काही भागांत पथदिवे आणि विजेची सोय करण्यात आली नाही. तर आदमनगर, हिमायत नगर, सिद्धेश्वर नगर, सम्राट अशोक नगर, अब्दुल कलाम नगर आदी नगरांत पक्क्या रस्त्यांअभावी नागरिकांची गैरसोय होत आहे. हरिभाऊ नगर येथील खणी भागात गटारींची व्यवस्था नसल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे रस्त्यांवर चिखल होत आहे. परिणामी, अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याकडे मनपा प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
या मूलभूत प्रश्नांसाठी नागरिकांनी मनपा प्रशासनाला वेळोवेळी निवेदने दिली आहेत. मात्र या समस्या प्रशासनाने सोडविल्या नाहीत. मनपा प्रवेशद्वारासमोर मनसेच्या वतीने सोमवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी नागरिकांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)