मनसेचे पदाधिकारी ताटकळून गेले निघून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:04 AM2021-07-03T04:04:46+5:302021-07-03T04:04:46+5:30
घोषणाबाजी : सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत परवानगीची होती मागणी औरंगाबाद : जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष अधिकार वापरून लॉकडाऊनची ...
घोषणाबाजी : सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत परवानगीची होती मागणी
औरंगाबाद : जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष अधिकार वापरून लॉकडाऊनची वेळ दुपारी ४ ऐवजी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत करावी, या मागणीसाठी मनसेचे पदाधिकारी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना भेटण्यासाठी शुक्रवारी गेले होते. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी वेळ न दिल्यामुळे तासभर ताटकळत बसलेल्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांविरोधात घोषणाबाजी करीत कार्यालय सोडले.
राज्य सरकारने लॉकडाऊन संदर्भात नवीन नियमावली जाहीर केली. तीच नियमावली जिल्हा प्रशासनाने येथे लागू केली आहे. मागील ८ ते १० दिवसांपासून जिल्ह्यात व शहरात कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळत नाहीत. त्यामुळे १२ तास सर्व व्यवहारांना मुभा देण्याची गरज आहे. अशी परवानगी दिल्यास अनेक व्यापारी तसेच रोजंदारी कामगारांचे हाल होणार नाहीत. जनतेलादेखील खरेदी करण्यासाठी नियोजित वेळ मिळेल, अशी मागणी करीत मनसे जिल्हा अध्यक्ष सुहास दाशरथे, शहर प्रमुख सतनामसिंग गुलाटी, संदीप कुलकर्णी, अशोक पवार हे जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते.
नियम फक्त सामान्य नागरिकांनाच का?
पालकमंत्र्यांच्या हस्ते अनेक उद्घाटने होणार म्हणून जिल्ह्यात शासनाने जाहीर केलेली नियमावली एक दिवस उशिरा लागू केली. त्या उद्घाटनात सर्व नियमांची पायमल्ली करण्यात आली, असा आरोप करीत जिल्हाध्यक्ष दाशरथे म्हणाले, त्या वेळी कोरोना संसर्ग नव्हता काय? नियम हे फक्त सामान्य जनतेसाठीच आहेत काय? जिल्हा प्रशासनाला वेळ मागूनही कुणी पुढे येत नसल्यामुळे प्रशासनाचा निषेध करीत आम्ही बाहेर पडलो.