OBC Reservation: “महानगरपालिका निवडणुका पुढे ढकलण्यासाठी ओबीसी आरक्षणाचा गोंधळ”: राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 04:34 PM2021-12-14T16:34:19+5:302021-12-14T16:35:26+5:30
OBC Reservation: केंद्राने मोजायचे की राज्याचे मोजायचे, यावरून मोजामोजी सुरु झाली आहे, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.
औरंगाबाद: गेल्या काही महिन्यांपासून भाजपने ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) मुद्दा लावून धरला आहे. या मुद्द्यावरून महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर सातत्याने टीकाही केली जात आहे. यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर स्पष्ट भाष्य केले आहे. राज्यभरातील महानगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यासाठीच ओबीसी आरक्षणाचा गोंधळ सुरु आहे, असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.
औरंगाबाद दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी पत्रकारांशी विविध मुद्द्यावर सविस्तर मते मांडली. निवडणुकीच्यावेळी मुख्य मुद्दे बाजूलाच राहतात. राजकारणी समाजाला बिघडवतो की, समाज राजकारण्यांना बिघडवतो. जोपर्यंत मतपेटीतून राग व्यक्त होणार नाही, तोपर्यंत कशाचाही अर्थ राहणार नाही. सध्या तरी मला लोक फुकट घालवत आहेत, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
निवडणुका पुढे ढकलण्यासाठी ओबीसी आरक्षणाचा गोंधळ
राज्यभरातील महानगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यासाठीच ओबीसी आरक्षणाचा गोंधळ सुरू आहे. निवडणुका पुढे ढकलण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार मुद्दाम ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून घोळ घालत आहेत. निवडणुकीसाठी बाहेर पडलोय, असे म्हणता येणार नाही. निवडणुका येत राहतात. संभाजी नगरची निवडणूक वर्षभर पुढे आहे. निदान सहा आठ महिने तरी निवडणूक होणार नाही. त्यासाठीच तर ओबीसीचे प्रकरण सुरु केले आहे. केंद्राने मोजायचे की राज्याचे मोजायचे, यावरून मोजामोजी सुरु झाली आहे. मूळ मुद्द्याला कुणीही सामोरे जायला तयार नाही. त्यांची हिंमतच नाही सामोरे जाण्याची. म्हणून निवडणूका पुढे ढकलण्याची शक्यता आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
महाविकास आघाडी सरकार पडेल असे वाटते का?
ठाकरे सरकार पडेल असे वाटतं का, असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावर सत्तेत असलेल्या तीन पक्षांकडे पाहता हे सरकार पडेल असे वाटत नाही, असे उत्तर राज ठाकरे यांनी दिले. तसेच स्ट्रॅटेजी ही हिडनच असते, उघड केली जात नाही. तुमच्याशी बोलण्याइतपत आमचे काम झालेले नाही. जिल्हाध्यक्ष, शहर संघटक, शहर अध्यक्ष यासह विविध नियुक्त्या केल्याची माहिती राज ठाकरे यांनी यावेळी बोलताना दिली.