मनसे लागली लोकसभा निवडणुकीच्या तयारीला; बाळा नांदगावकर 3 दिवस छत्रपती संभाजीनगरात
By बापू सोळुंके | Published: October 6, 2023 12:14 PM2023-10-06T12:14:48+5:302023-10-06T12:18:07+5:30
पुढील काही दिवसांत राज ठाकरे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येणार आहेत.
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर, दिलीप धोत्रे तीन दिवस जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघनिहाय पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. विशेष म्हणजे नांदगावकर यांचा पंधरा दिवसातील हा दुसरा दौरा आहे.
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे बोलले जाते. मात्र, गत लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला पराभवाला सामोरे जावे लागले होते आणि राज्यातील एमआयएम पक्षाचा पहिला खासदार येथून निवडल्या गेला होता. आता छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी सुरू झाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी गुरुवारी दिवसभर शहरातील एका हॉटेलमध्ये मनसे आणि अंगीकृत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.
यावेळी नांदगावकर यांनी पंधरा दिवसांपूर्वी पदाधिकाऱ्यांना सांगितलेल्या कामाचा त्यांनी आढावा घेतला. पुढील काही दिवसांत राज ठाकरे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येणार आहेत. तत्पूर्वी पदाधिकाऱ्यांनी सर्व शाखा पूर्ण कराव्यात आणि बुथनिहाय बैठकीला सुरुवात करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. यावेळी मनसे सरचिटणीस संतोष नागरगोजे, सतनामसिंग गुलाटी, जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर, राजीव जावळीकर यांच्यासह शहरातील अन्य प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.