मनसेचा आज फैसला!
By Admin | Published: May 28, 2014 12:50 AM2014-05-28T00:50:52+5:302014-05-28T01:14:11+5:30
सुनील कच्छवे , औरंगाबाद मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवार देण्यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही चाचपणी सुरू केली आहे.
सुनील कच्छवे , औरंगाबाद मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवार देण्यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही चाचपणी सुरू केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी बैठक घेऊन यासंदर्भात प्राथमिक चर्चा केली. उद्या बुधवारी ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी पुन्हा एक बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकीत उमेदवार द्यायचा की नाही यासंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक नुकतीच जाहीर झाली आहे. त्यामुळे विभागात सध्या निवडणुकीचे ‘तापमान’ वाढत आहे. या निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीसह काँग्रेसचाही उमेदवार असणार हे निश्चित. मनसेचाही उमेदवार निवडणुकीच्या फडात उतरण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत अनेक जागांवर मनसेच्या उमेदवारांना मोठा पराभव पत्करावा लागला. सर्वच उमेदवारांना आपले डिपॉझिटही गमवावे लागले. त्यामुळे मनसे सावध पावले उचलत आहे. पदवीधरच्या निवडणुकीत उमेदवार देण्यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी मुंबईत पदाधिकार्यांची एक बैठक घेतली. या बैठकीत पदवीधर मतदारसंघातील मनसेचे बळ, इच्छुक उमेदवार आदी मुद्यांवर प्राथमिक चर्चा झाली; मात्र अंतिम निर्णय होऊ शकला नाही. बुधवारी सकाळी ११.३० वाजता पुन्हा बैठक होणार आहे. बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, स्थानिक पदाधिकार्यांनी मात्र खाजगीत बोलताना पदवीधरच्या रिंगणात मनसे उमेदवार देण्याची शक्यता कमीच असल्याचे सांगितले. पक्षाने विधानसभेच्या तयारीवर भर देण्याचे ठरविले असल्याचे पदाधिकारी म्हणाले. औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मनसेने आपला उमेदवार दिला नव्हता. मात्र त्यावेळी मनसेने ऐनवेळी काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुभाष झांबड यांना पाठिंबा दिला. औरंगाबाद जिल्हा परिषद आणि औरंगाबाद पंचायत समितीमध्ये मनसे काँग्रेससोबतच आहे. उमेदवार देण्यासंदर्भात आज राज ठाकरे यांच्याकडे बैठक झाली. उद्या पुन्हा यासंदर्भात बैठक होणार आहे. त्यात उमेदवार द्यायचा किंवा नाही, हे ठरेल. -सतीश नारकर, संपर्क अध्यक्ष, मनसे