मनसेचे 'रेल्वे इंजिन' पुन्हा अवतरले; राजमुद्रासह सभेच्या ठिकाणी झळकले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 06:56 PM2022-04-30T18:56:41+5:302022-04-30T18:57:16+5:30
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ उद्या १ मे रोजी औरंगाबाद येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर धडाडणार आहे.
औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभास्थळी अनेक दिवसांपासून गायब असलेले रेल्वे इंजिन दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पक्षाचा झेंडा आणि चिन्ह बदल्यानंतर अनेक दिवसांनी रेल्वे इंजिन हे निवडणूक चिन्ह सभेच्या ठिकाणी दिसल्याने राज ठाकरे यांनी आगामी निवडणुका लढण्याचे संकेत दिल्याची चर्चा होत आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ उद्या १ मे रोजी औरंगाबाद येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर धडाडणार आहे. 'मशिदीवरील भोंगा हटाव' मोहीम हाती घेतल्यानंतर राज ठाकरे यांची सभा होत असल्याने व्यासपीठ कसे असणार याची सर्वांनी उत्सुकता होती. यातच राज ठाकरे यांच्या सभेच्या व्यासपीठामागे भगव्या पडद्यावर राजमुद्रा आणि रेल्वे इंजिन दिसत आहेत. तसेच शहरात आणि सभास्थळी लावलेल्या भगव्या झेंड्यांवर देखील रेल्वे इंजिन दिसल्याने चर्चा सुरु झाली आहे.
मनसेचा आधीचा झेंडा हा विविध रंगांचा होता. त्यात वर निळा आणि तळाला हिरवा रंग होता. तर मध्ये या दोन रंगांपेक्षा थोडा मोठा भगवा रंग होता. मात्र, २०२० मध्ये मनसेच्या नव्या झेंड्यात संपूर्ण भगवा रंग आणि त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आली. त्या झेंड्यावर तीन रंगांऐवजी फक्त एकच भगवा रंग दिसला. राज ठाकरे यांनी प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेतल्यानंतर आता भगव्या झेंड्यांवर रेल्वे इंजिन आल्याने हे येणाऱ्या निवडणुकांसाठी काही संकेत आहेत का हे येणाऱ्या काळातच दिसून येईल.