Video: छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ निघालेली मनसेची स्वप्नपूर्ती रॅली पोलिसांनी अडवली
By बापू सोळुंके | Published: March 16, 2023 01:16 PM2023-03-16T13:16:39+5:302023-03-16T13:17:47+5:30
विनापरवानगी काढली होती मनसेने रॅली; काही अंतरांवर जाताच पोलिसांनी आंदोलक घेतले ताब्यात
छत्रपती संभाजी नगर : छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या समर्थनार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आयोजित स्वप्नपूर्ती रॅलीची सुरुवात संस्थान गणपतीच्या आरतीने झाली. या रॅलीसाठी पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलकांवर कारवाई करत पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
संस्थान गणपती राजाबाजार ते शहागंज अशी सुमारे 100 मीटर अंतर पर्यंत रॅली येऊ दिली जाणार आहे. यानंतर पोलिसांनी मनसैनिकांना अडवण्यासाठी बॅरिकेट लावून ठेवले होते. रॅली येताच आंदोलकांना ताब्यात घेण्यास पोलिस सरसावले. येथे पोलीस उपायुक्त दीपक गिरे यांच्यासह आणि अन्य अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. नामांतर विरोधात मोर्चास परवानगी मिळते आम्हाला का मिळत नाही? असा सवाल यावेळी मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केला.
पावसाची सावट, आकाशात ढगांचा कडकडाट या पार्श्वभूमीवर हे आंदोलन होते किंवा नाही अशी चर्चा केली जात होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी भगवी टोपी डोक्यात घालून आणि महाराष्ट्र निर्माण सेनेचे झेंडे फडकावीत घोषणा देत रॅलीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. दरम्यान, महाराष्ट्र सेनेचे नेते प्रकाश महाजन, संपर्क नेते संतोष धोत्रे, जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर आदींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मराठवाड्यातील अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आंदोलनात सहभागी आहेत.
छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या समर्थनार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्वप्नपूर्ती रॅली, परवानगी नसल्यामुळे आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात...#MNS#ChhatrapatiSambhajinagarpic.twitter.com/rPvo69YDvs
— Lokmat (@lokmat) March 16, 2023