मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन बनली शोभेची वस्तू
By Admin | Published: May 19, 2017 12:26 AM2017-05-19T00:26:13+5:302017-05-19T00:29:15+5:30
जालना : तांत्रिकदृष्ट्या योग्य हाताळणी करण्यासाठी तज्ज्ञच नसल्यामुळे फारेन्सिक व्हॅन शोभेची वस्तू बनली आहे.
बाबासाहेब म्हस्के ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : गंभीर गुन्ह्यांमध्ये घटना स्थळावरून शास्त्रशुद्ध पद्धतीने पुरावे गोळा करणे, त्याचे योग्य विश्लेषण करणे यासाठी जिल्हा पोलीस दलास मोबाईल फॉॅरेन्सिक इनव्हेस्टिगेशन व्हॅनसह आवश्यक उपकरणेही उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मात्र, तांत्रिकदृष्ट्या योग्य हाताळणी करण्यासाठी तज्ज्ञच नसल्यामुळे फारेन्सिक व्हॅन शोभेची वस्तू बनली आहे.
पोलीस दलातील तपास अधिकाऱ्यांना घटनास्थळावरून शास्त्रशुद्ध पद्धतीने पुरावे कसे गोळा करावे याचे प्रशिक्षण नसते. त्यामुळे अनेकदा गंभीर गुन्ह्यांमधील आरोपी ठोस पुराव्यांअभावी निर्दोष सुटण्याची शक्यता असते. हे लक्षात घेता गृह विभागाने प्रत्येक जिल्ह्यास मोबाईल फॉरेन्सिक इनव्हेस्टिगेशन व्हॅन उपलब्ध करून दिल्या आहेत. येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात जून २०१६ मोबार्ईल इनव्हेस्टिगेशन व्हॅन प्राप्त झाली आहे. व्हनमधील उपकरणांची हातळणी करण्यासाठी तज्ज्ञांची तीन पदे मंजूर आहेत. प्रत्यक्षात एकही तज्ज्ञ रुजू झालेला नाही. त्यामुळे मोबाइल व्हॅन वर्षभरापासून एकाच ठिकाणी उभी आहे. तज्ज्ञच मिळत नसल्यामुळे विज्ञान शाखेतून शिक्षण घेतलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनाच मोबाईल इनव्हेस्टिगेशन व्हॅन हातळणीचे प्रशिक्षण देण्याचे विचाराधीन असल्याचे पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी सांगितले.