मोबाइलवरील ‘गेम’ पडतोय महागात, १० पैकी ८ मुलांच्या डोळ्यांना त्रास
By संतोष हिरेमठ | Published: November 29, 2022 04:39 PM2022-11-29T16:39:21+5:302022-11-29T16:39:54+5:30
मोबाइलवर जवळचे पाहताना, दूरची नजर कमजोर होण्याची भीती, संशोधन सुरू
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद :मोबाइल, लॅपटाॅप यासारखी नवीन इलेक्ट्राॅनिक गॅझेट, त्यावरील व्हिडीओ गेम हे आता अधिक प्रमाणात लहान मुलांना उपलब्ध झाले आहेत. कोणत्याही गोष्टीचा अतिवापर नेहमी घातकच असतो. नेत्रतज्ज्ञांकडे ओपीडीत १० लहान मुले उपचारांसाठी येत असतील तर त्यातील ८ मुलांना इलेक्ट्राॅनिक गॅझेट्सच्या वापरामुळे डोळ्यांना त्रास होत असतो. मोबाइलचा वापर करताना जवळचे पाहावे लागते. त्यामुळे डोळ्यावर ताण पडतो. दूरच्या नजरेवर परिणाम होऊ शकतो. त्यावर शास्त्रीयदृष्ट्या संशोधन सुरू आहे, असे महाराष्ट्र नेत्ररोगतज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. संतोष भिडे म्हणाले.
औरंगाबादेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) नेत्ररोग विभागात शनिवारी आयोजित कार्यशाळेप्रसंगी डाॅ. भिडे यांची उपस्थिती होती. यावेळी ‘लोकमत’ प्रतिनिधीशी त्यांनी संवाद साधला. डाॅ. भिडे म्हणाले,‘अपटेड टू अपग्रेड’ अशी यावर्षी संघटनेची संकल्पना आहे. याच संकल्पनेखाली संघटनेचे कार्यक्रम होणार आहेत. प्रत्येक डाॅक्टरने आपले ज्ञान अद्ययावत केले पाहिजे. नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. त्याचा रुग्णाला फायदा होईल.
सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेही रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. भारत हा मधुमेही रुग्णांची राजधानी बनला आहे. मधुमेह रुग्णांमध्ये रक्तात वाढलेल्या साखरेमुळे डोळ्यावर दुष्परिणाम होतो. कायमचे अंधत्व येऊ शकते. हे दुष्परिणाम टाळण्यासाठी मधुमेही रुग्णांनी नियमितपणे तपासणी केली पाहिजे. त्यातून अंधत्व टाळता येऊ शकते. ४० वर्षांवरील नागरिकांनी डोळ्यांचा दाब तपासणे गरजेचा आहे. काचबिंदू होणार नाही ना, याची काळजी घेतली पाहिजे. वेळीच निदान झाले तर काचबिंदूमुळे होणारे अंधत्वही टाळता येऊ शकते, असे ते म्हणाले
मुलांमध्ये वाढतेय चष्म्याचे प्रमाण
मुले ही सारखी मोबाइलमध्ये खेळत असल्याने चष्मा लागण्याचे प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे याकडे पालकांनी वेळीच लक्ष दिले पाहिजे. इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स वापरण्याच्या सवयीबाबत अधिक व्यापक प्रमाणात जनजागृती करावी लागेल. दहा वर्षांपूर्वी आणि आताच्या डोळ्यांच्या आजारात काही वेगळे झालेले नाही. परंतु डोळ्यांची काळजी घेण्याचे, तपासणीचे प्रमाण वाढले आहे, असेही डाॅ. संतोष भिडे म्हणाले.