सिल्लोड महोत्सवाच्या नावाने लिंक पाठवून १०० जणांचे मोबाइल हॅक, यूपीआयद्वारे लाखों लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 07:10 PM2024-01-23T19:10:36+5:302024-01-23T19:11:28+5:30
सायबर भामट्यांनी सिल्लोड महोत्सवाच्या कालावधीत या महोत्सवाच्या नावाने लिंक तयार केल्या
- श्यामकुमार पुरे
सिल्लोड : शहरात झालेल्या सिल्लोड महोत्सवाच्या नावाने लिंक पाठवून १०० जणांचे मोबाइल हॅक केल्याचे प्रकार घडले असून, या माध्यमातून लाखो रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडूनही तक्रार घेतली जात नसल्याने तेही हतबल झाल्याचे दिसत आहे.
सिल्लोड येथे १ ते १७ जानेवारी यादरम्यान सिल्लोड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात लावण्या, कव्वाली, ऑर्केस्ट्रा, नामवंत गायकांचे शो आदी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हे सर्व कार्यक्रम फेसबुक, यू-ट्युबवर लाइव्ह करण्यात आले होते. याबाबतची माहिती सर्वसामान्यांना मिळावी, यासाठी या कार्यक्रमांच्या लिंक सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्या होत्या. याचा गैरफायदा घेत सायबर भामट्यांनी सिल्लोड महोत्सवाच्या कालावधीत या महोत्सवाच्या नावाने लिंक तयार केल्या. त्या सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्या. सदरील लिंकवर क्लिक केल्यानंतर संबंधितांचे मोबाइल हॅक होऊ लागले.
मोबाइल हॅक झाल्यानंतर सदरील मोबाइलमधील कॉन्टॅक्ट नंबरवर व्हाॅट्सॲपच्या माध्यमातून संपर्क साधला जायचा. त्यावर समोरील व्यक्तीकडे १ हजार, २ हजार रुपये अर्जंट हवे आहेत, असे सांगून पैशाची मागणी केली जात होती. ओळखीतील व्यक्तीचा मोबाइल नंबर आल्याने समोरील व्यक्तीही अडचण असेल असे समजून पैसे पाठवित होते. पाठविलेले पैसे हॅकर आपल्या खात्यात वळते करून घेत असत. शिवाय, हॅकर गुगल पे, फोन पे आदी ॲपच्या माध्यमातून पैसे काढून घेत होते. याद्वारे तासाभरातच अनेकांच्या बँक खात्यावर या सायबर भामट्यांनी डल्ला मारला. अशा घटना घडत असल्यानंतर अनेकांनी लगेच बँकेला संपर्क करून फोन पे, गुगल पे बंद केले. बँकेला सांगून अकाउंट बंद केले आणि मोबाइलला सॉफ्टवेअर मारले. त्यानंतर हा प्रकार बंद झाला. याचा फटका अनेक व्यापारी, सिल्लोड महोत्सवाशी संबंधित अधिकारी, राजकीय नेते, पत्रकार आदी दिग्गज व्यक्तींना बसला. याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी अनेक नागरिक गेले; परंतु असे गुन्हे उघड होत नाहीत, हॅकर्स काही तासांत सिम बंद करतात, तक्रार करून फायदा नाही, असे सांगून तक्रार घेण्यात टाळाटाळ करीत असल्याने संबंधितांचा नाईलाज झाला.
मित्रांनी पाठविलेली रक्कम खात्यात आलीच नाही
मला सिल्लोड महोत्सवाची लिंक आपणास आली होती. सदरील लिंकवर आपण क्लिक केल्यानंतर माझा मोबाइल हॅक झाला. त्यानंतर माझ्या नावाने माझ्या १० मित्रांकडे पैशाची मागणी करण्यात आली. मित्रांनी एकूण १० हजार रुपये पाठविले. याबाबत मित्रांमार्फत माहिती मिळाल्यानंतर माझे बँक खाते तपासले असता, खात्यात रक्कम आली नाही. हॅकरने परस्पर ती आपल्या खात्यात वळती करून घेतली.
- साहील खान (नाव बदललेले आहे.) नागरिक, सिल्लोड.
तक्रार करून काहीच फायदा नाही
जिल्ह्यात एकूण ४७० जणांनी विविध घटनेत अशीच फसवणूक झाल्याची सायबर क्राइमकडे तक्रार दिली आहे. वर्ष उलटले तरी गुन्हे उघड झाले नाहीत. तक्रार करून काहीच फायदा होत नाही. हॅकर्स सिम तोडून फेकून देतात. याला सतर्कता हाच एकमेव पर्याय आहे. कुणी कुणाला पैसे पाठविण्यापूर्वी संपर्क करावा व फसवणूक टाळावी, हाच पर्याय आहे.
-शेषराव उदार, पोलिस निरीक्षक, सिल्लोड शहर.