मोबाइल मेकॅनिक आणि किराणा दुकानदाराने संपविली जीवनयात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 12:45 AM2017-10-24T00:45:38+5:302017-10-24T00:45:38+5:30
पुंडलिकनगर येथे मोबाइल मेकॅनिकने तर रमानगरात किराणा दुकानदाराने काही तरी कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : पुंडलिकनगर येथे मोबाइल मेकॅनिकने तर रमानगरात किराणा दुकानदाराने काही तरी कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले. याप्रकरणी अनुक्रमे पुंडलिकनगर आणि उस्मानपुरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
पोलिसांनी सांगितले की, पुंडलिकनगर येथील गल्ली नंबर १ मध्ये संतोष रामदास दारटकर (३५) हा मेकॅनिक असून, तो पैठणगेट येथील एका दुकानात मोबाइल दुरुस्तीचे काम करतो. त्याची पत्नी, मुलगा आणि मुलीसह भाऊबीजनिमित्त माहेरी गेले होते. यामुळे रविवारी रात्री तो घरी एकटाच होता. रात्री केव्हा तरी त्याने राहत्या घरात पंख्याला साडी बांधून गळफास घेतला. सोमवारी सकाळी ९ वाजेपर्यंत तो झोपेतून न उठल्याने शेजाºयांनी खिडकीतून संतोषच्या रूममध्ये डोकावून पाहिले असता त्याने गळफास घेतल्याचे दिसले. या घटनेची माहिती त्याच्या नातेवाईक आणि पोलिसांना देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक सय्यद आणि पोलीस हेडकॉन्स्टेबल एकनाथ चव्हाण, दीपक देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेऊन संतोषला बेशुद्धावस्थेत घाटीत दाखल केले. अपघात विभागातील डॉक्टरांनी संतोषला तपासून मृत घोषित केले. संतोषच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. या घटनेचा तपास पोहेकॉ. एकनाथ चव्हाण करीत आहेत.
रमानगर येथे घडलेल्या अन्य एका घटनेत किराणा दुकानदार कृष्णा तुळशीराम वाहूळ (५०) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी १०.१५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. कृष्णा हे रमानगर येथे किराणा दुकान चालवीत होते. या दुकानाच्या मागील खोली ते राहतात. रविवारी दिवसभर किराणा दुकान चालविल्यानंतर रात्री जेवण करून ते झोपले. सकाळी नेहमीप्रमाणे त्यांनी दुकान उघडले नाही. त्यांनी त्यांच्या बेडरूममध्ये छताच्या लाकडी बल्लीला दोरी बांधून गळफास घेतला. ही घटना उघडकीस आल्यानंतर उस्मानपुरा पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या घटनेचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल पी. एन. शुक्ला करीत आहेत.