नवरा-बायकोमधील वादाला कारणीभूत ‘मोबाइल फोेन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 12:06 AM2017-11-24T00:06:32+5:302017-11-24T00:06:41+5:30
मॅडम माझी बायको सतत मोबाइलवर बोलते, माझा नवरा रात्रंदिवस मोबाइलवर चॅटिंग करतो, यामुळे आमच्यात सतत भांडण होत असल्याने आम्ही आता एकत्र राहू शकत नाही, अशा प्रकारच्या सुमारे ८० टक्के तक्रारी रोज पोलीस आयुक्तालयातील महिला तक्रार निवारण मंचात दाखल होतात. यातील ५० टक्के जोडप्यांचे समुपदेशन करून त्यांची मने जुळविण्यात पोलीस अधिकारी, कर्मचा-यांना यश येते.
बापू सोळुंके ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मॅडम माझी बायको सतत मोबाइलवर बोलते, माझा नवरा रात्रंदिवस मोबाइलवर चॅटिंग करतो, यामुळे आमच्यात सतत भांडण होत असल्याने आम्ही आता एकत्र राहू शकत नाही, अशा प्रकारच्या सुमारे ८० टक्के तक्रारी रोज पोलीस आयुक्तालयातील महिला तक्रार निवारण मंचात दाखल होतात. यातील ५० टक्के जोडप्यांचे समुपदेशन करून त्यांची मने जुळविण्यात पोलीस अधिकारी, कर्मचा-यांना यश येते.
याविषयी अधिक माहिती अशी की, लग्न झाल्यानंतर संसार सुरळीत चालावा, यासाठी पती-पत्नीसोबतच सासर आणि माहेरच्या मंडळींची भूमिकाही महत्त्वाची ठरत असते. आजच्या सारखी पूर्वी दळणवळण आणि संपर्काची साधने नव्हती. यामुळे सासरी गेलेल्या विवाहितेला माहेरी निरोप पत्राद्वारेच पाठवावे
लागत.
दिवाळी, भाऊबीज, रक्षाबंधन अशा सणासाठी ती माहेरी जाई. आता मात्र मोबाइल आणि दळणवळणाच्या साधनांमुळे जग जवळच आले आहे.
पती-पत्नीत भांडण जेव्हा विकोपाला जाते तेव्हा प्रकरण पोलिसांच्या दारात पोहोचते. तेव्हा पोलीस ठाण्याचे अधिकारी ही तक्रार महिला तक्रार निवारण मंचाकडे वर्ग करते. जानेवारीपासून आतापर्यंत ११६७ तक्रारी दाखल झाल्या. यापैैकी २३७ जोडप्यांचे समुपदेशन करून त्यांची मने जुळविण्यात पोलिसांना यश आले.
२०१ जोडप्यांच्या तक्रारी विविध कारणांमुळे निकाली काढल्या, तर १४१ जोडप्यांना पोलीस ठाण्यात तर १३८ जोडप्यांना कोर्टात पाठविण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक किरण पाटील यांनी दिली. तसेच ३७० जोडप्यांचे समुपदेशन सध्या आम्ही करीत आहोत.
त्या म्हणाल्या की, पती-पत्नीच्या वादाला कारणीभूत असलेल्या विविध कारणांमध्ये मोबाइल हे प्रमुख कारण म्हणून वेगाने पुढे येऊ लागले. सासरी काही भांडण झाले तर विवाहिता लगेच माहेरी फोन करून सर्वकाही सांगते. यानंतर माहेरच्या मंडळीकडून तिच्या घरात हस्तक्षेप करण्यास सुरुवात होते आणि वाद पोलिसांपर्यंत येतो.
संयुक्त कुटुंबात राहून संसार करण्यास अनेक मुली नकार देतात. त्यांना पतीसोबत वेगळे राहायचे असते, तर मुलाला आई-वडिलासोबत. यामुळे पती-पत्नीत भांडण होते, तर एकुलत्या एक मुलाच्या लग्नानंतर त्याच्या आई-वडिलांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होते. सून मुलाला आपल्यापासून दूर नेईन असे त्यांना वाटते. त्यांचा सांभाळ करणारी सून त्यांना हवी असते तर सुनेला सासू-सासरे नको असतात. पती-पत्नीपैकी कोणाचेतरी बाहेर अफेअर असणे, हे एक कारण संसार तुटण्यात असते. मोबाइलवर सतत चॅटिंग करण्याच्या कारणातूनही जोडप्यात भांडण होते, असे पोलीस निरीक्षक पाटील म्हणाल्या.