मटकाचालकांनीही बनवले सॉफ्टवेअर; १० रुपयांना ९०० रुपयांचे आमिष, कोटींची उलाढाल

By सुमित डोळे | Published: September 22, 2023 04:07 PM2023-09-22T16:07:31+5:302023-09-22T16:08:26+5:30

सिडको पोलिसांचे दोन ठिकाणी छापे, राज्यभरात मटका व्यावसायिकांचे हे अवैध लॉटरीचे जाळे पसरले आहे.

Mobile software for Matka gambling; Bait of Rs 900 for Rs 10, turnover of crores | मटकाचालकांनीही बनवले सॉफ्टवेअर; १० रुपयांना ९०० रुपयांचे आमिष, कोटींची उलाढाल

मटकाचालकांनीही बनवले सॉफ्टवेअर; १० रुपयांना ९०० रुपयांचे आमिष, कोटींची उलाढाल

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : मटका चालकांच्या रॅकेटने स्वत : तयार केलेल्या सॉफ्टेवअरवर तरुण, गरिबांकडून लॉटरीच्या नावाखाली जुगार खेळवून लाखोंची उलाढाल सुरू आहे. सिडको पोलिसांनी बुधवारी एकाच वेळी दोन ठिकाणी मारलेल्या छाप्यात हे रॅकेट समोर आले. पिसादेवी रस्त्यावरील व एन-८ मधील राजश्री लॉटरीच्या सेंटरवरून किरण सुलाल बसय्ये (४३, रा. नवाबपुरा), शकिल सादिक सय्यद (३५, रा. मिसारवाडी), दत्ता नामदेव कारके (२८), आण्णा बाबासाहेब उडान (३५, दोघेही रा. बंबाटनगर) यांना छाप्यात ताब्यात घेतले. चंदू डोणगावकर व खडके यांनी यासाठीचे सॉफ्टवेअर व अन्य साहित्य पुरवून २० टक्क्याने कंत्राट दिल्याचे आरोपींनी कबूल केले.

पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांनी सिडकोचा पदभार स्विकारताच सर्व अवैध व्यवसाय बंद करण्याची ताकीद दिली होती. तरीही डोणगावकरचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती त्यांना खबऱ्याने दिली. सहायक निरीक्षक मनोज शिंदे, उपनिरीक्षक अमोल म्हस्के यांनी बागवडे यांच्या सूचनेवरून बुधवारी दुपारी पथकासह दोन्ही ठिकाणी छापे मारले. छाप्यात लाभ लक्ष्मी कुपन या ऑनलाइन लॉटरीच्या चिठ्या सापडल्या. त्यांच्याकडे कुठलाही शासकीय परवाना, महसुलाची माहिती नव्हती. अंमलदार विशाल सोनवणे, किरण काळे, सुभाष शेवाळे, लालखान पठाण, मंगेश पवार, अविनाश पांढरे यांनी तत्काळ सर्व आरोपींना ताब्यात घेत साहित्य जप्त केले.

जिंकल्यास १० ला ९०० रुपये
शहरात अनेक ठिकाणी अवैध लॉटरी सेंटर चालतात. परंतु हा लॉटरीचा प्रकार नसून देशपातळीवरील बड्या मटका व्यवसायिकांनी निर्माण केलेल्या सॉफ्टवेअरद्वारे हा जुगार खेळवला जातो. ते कसे, केव्हा ऑपरेट करायचे हे ते ठरवतात. १० रुपयांना ९०० रुपयांचा यात दर असतो. गरीब, तरुणांना याची सवय लावली जाते. यात कोट्यवधींची उलाढाल होते. शहरातील अनेक उच्चपदस्थ नेत्यांसोबत हितसंबंध असलेले चंदू व खडके हे शहराचे प्रमुख एजंट आहेत. एका सेंटरच्या दिवसभराच्या कमाईपैकी २० टक्के ते कमिशन घेतात. यात अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत.

गुजरात व्हाया मुंबई, पुणे
राज्यभरात मटका व्यावसायिकांचे हे अवैध लॉटरीचे जाळे पसरले आहे. पुण्यातील बडे एजंट मुंबई वगळून उर्वरित राज्याचा कारभार पाहतात. मुंबई, गुजरातवरून हे सर्व साॅफ्टवेअर ऑपरेट होते. टेलिग्रामवर ते एकमेकांच्या संपर्कात राहतात.

Web Title: Mobile software for Matka gambling; Bait of Rs 900 for Rs 10, turnover of crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.