मोबाइलने बिघडवले बालकांचे आरोग्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:04 AM2021-03-06T04:04:31+5:302021-03-06T04:04:31+5:30
कोरोनाच्या आधी पालक मुलांना मोबाइलपासून दूर ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करायचे. तरीही काही मुले दिवसातून तास- दोन तास मोबाइलवर घालवायचीच. ...
कोरोनाच्या आधी पालक मुलांना मोबाइलपासून दूर ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करायचे. तरीही काही मुले दिवसातून तास- दोन तास मोबाइलवर घालवायचीच. आता मात्र कोरोनाने मुलांचे आणि मोबाइलचे नाते आणखीनच घट्ट केले आहे. शाळेत उपस्थिती लाव, अभ्यास कर, ट्यूशन कर असे म्हणत आता पालकांनाच मुलांच्या हातात मोबाइल द्यावा लागत आहे.
बहुतांश शाळांचे प्राथमिक वर्गही तीन ते चार तास असतात. त्यामुळे एवढ्या लहान वयाच्या मुलांना सक्तीने तीन ते चार तास मोबाइलसमोर बसावे लागत आहे. त्यातच अनेक शाळांचे अभ्यासही मोबाइलवर येत असल्याने पुन्हा मुलांचा स्क्रीनिंग टाइम वाढत आहे. कोरोनामुळे आता पुन्हा मित्र- मैत्रिणींसोबत घराबाहेर पडणे सक्तीचे झाल्याने विरंगुळा म्हणून मुलांच्या हातात मोबाइल येत आहे. मुलांच्या या मोबाइल वेडामुळे पालक मात्र त्रस्त झाले आहेत.
चौकट :
मुले कायम मोबाइलवर
शाळा, ट्यूशन या सगळ्या गोष्टींना आता मोबाइलशिवाय पर्याय राहिला नाही. त्यामुळे पालकांना नाइलाजाने मुलांच्या हातात तीन- चार तासांसाठी मोबाइल द्यावाच लागत आहे. शाळेसाठी लॅपटॉप आणि कॉम्प्युटरचा वापर करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण मोबाइल वापरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत खूपच कमी आहे. शाळा झाली की मोबाइलवरच गेम खेळत बसण्याची सवय अनेक बालकांना असल्याने सध्या बहुतांश घरांतील मुले कायमच मोबाइलवर दिसत आहेत.
चौकट :
विटीदांडू गायब
विटीदांडू, चिरकीपाणी, लपंडाव, गल्लीत रंगलेले क्रिकेट असे अनेक खेळ आता जणूकाही काळाच्या पडद्याआड गेले आहेत. आताच्या मुलांना या खेळांची नावेही माहिती नाहीत. कोरोनाने पुन्हा उसळी मारल्याने अनेक बालकांचे घराबाहेर पडणे आता पुन्हा एकदा बंद झाले आहे. यामुळे घरात राहून कंटाळलेल्या बालकांना आता मोबाइलचाच सहारा वाटतो आहे.
चौकट :
कोरोनामुळे मोबाइल गेम खेळण्याचे प्रमाण वाढले
कोरोनामुळे घरात बसणे सक्तीचे झाल्याने ज्येष्ठ नागरिकांसह लहान बालकेही वैतागली आहेत. खेळायला कुणी नसल्याने मुले किरकिर करत असतात. त्यामुळे मग पालकही त्यांच्या हातात नाइलाजाने मोबाइल सोपवितात. यामुळे नकळतच कोरोनामुळे मोबाइल गेम खेळण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.
प्रतिक्रिया-
१. स्क्रीन टाइम वाढल्याने मुलांच्या डोळ्यांच्या समस्या दिवसागणिक वाढत चालल्या आहेत. ज्या मुलांना आधीपासूनच चष्मा आहे, त्यांचाही नंबर वाढत चालला आहे. यासाठी २०- २०- २० हा फॉर्म्युला वापरावा. २० मिनिटे स्क्रीन पाहिल्यावर २० सेकंद २० फुटांपेक्षा लांबची गोष्ट पाहावी.
- डॉ. वैशाली उणे
नेत्ररोगतज्ज्ञ
२. घरात बसून राहणे, अभ्यास, गेम यासाठी मोबाइल वापरणे यामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होत आहे. जून महिन्यापासून मुलांना घेऊन येणाऱ्या पालकांचे प्रमाण वाढले आहे. मुलांचा चिडचिडेपणा वाढतो आहे. शाळेव्यतिरिक्त मुलांना मोबाइल न देणे, हाच यावरचा उपाय आहे.
- डॉ. अमोल देशमुख
मानसोपचारतज्ज्ञ